एक अज्ञात कॉल आला आणि… अक्षता डोक्यावर पडण्याआधीच ‘तिचा’ बालविवाह उधळला

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे कारण देऊन उल्हासनगर येथील कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीचा विवाह सोलापूरच्या 24 वर्षीय तरुणासोबत ठरवला होता. लग्नासाठी हॉलही बुक केला होता. वऱ्हाडीही हातात अक्षता घेऊन मंगलाष्टकाची वाट पाहत होते. मात्र एक निनावी फोन जिल्हा प्रशासनाला गेला आणि जोडप्याच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच बालविवाह उधळला गेला. महिला बालविकास विभागाच्या धडक कारवाईमुळे कोवळ्या मुलीचे भावविश्व उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.

उल्हासनगर शहरातील सेक्टर- 5 येथे संबंधित मुलीचे कुटुंब राहते. या कुटुंबीयांना त्यांच्या १६ वर्षीय मुलीचा सोलापूर येथील 24 वर्षीय मुलासमवेत बालविवाह करण्याचे ठरविले. यासाठी भाटिया हॉल येथे 24 फेब्रुवारी रोजी सर्व नियोजन करण्यात आले होते. याचदरम्यान या संपूर्ण प्रकरणाची माहिती एका अनोळखी महिलेने चाईल्ड लाईनच्या 1098 या संपर्क क्रमांकावर दिली. यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. जिल्हा महिला बालविकास विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी लागलीच उल्हासनगर शहरात धाव घेतली. यानंतर विवाहस्थळी दाखल होऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी बालविवाह रोखला.

1098 नंबर ठरला वरदान

बालविवाहामुळे माता मृत्यू दर वाढण्याचे प्रमाण आजही जास्त आहे. बालके ही कुपोषित जन्माला येतात. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढते. ज्यांना कोणालाही बालविवाह होत असल्याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ 1098 या नंबरवर संपर्क करावा. माहिती दिलेल्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवले जाते, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास विभागाने केले आहे.