
बेदरकारपणे मोटार चालवून कल्याणी नगरमध्ये दोघांचा बळी घेणाऱया बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाची मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच जामीनावर मुक्तता केली. या निकालाच्या विरोधात पुणे पोलीस सर्वेच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे.
कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. अपघात घडल्यानंतर मुलाला बाल न्याय मंडळाने 300 शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर 15 दिवस काम करणे, दारू सोडविण्यासाठी उपचार घ्यावेत, अशा अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बाल न्याय मंडळात निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली. मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. अल्पवयीन मुलाची आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी मुलाची मुक्तता करण्याचे आदेश दिले.
– 25 जून रोजी रात्री मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याला आत्याकडे सोपविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे सर्वेच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी मागितली होती.
z विधी आणि न्याय विभागाने पोलिसांना शनिवारी परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे पोलीस उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वेच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. दोन ते तीन दिवसांत पुणे पोलिसांकडून याची प्रक्रिया पूर्ण पाडली जाणार आहे.