पाडापाडीमुळे पालिकेच्या 60 कोटींच्या महसुलावर पाणी

चिखली-कुदळवाडीमध्ये अनधिकृत भंगार गोदामांसह शेकडो व्यावसायिक व लघुउद्योगांवर कारवाई केल्यानंतर आता महापालिकेचे सुमारे 60 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या भागात अनधिकृत व्यवसाय असले, तरी काही व्यावसायिक महापालिकेचा मालमत्ताकर दरवर्षी न चुकता भरत होते. त्यामुळे या व्यावसायिकांकडून महापालिका तिजोरीत चालू आर्थिक वर्षात जमा होऊ शकणारा सुमारे 60 कोटी रुपयांचा मालमत्ताकर बुडणार आहे. या कारवाईनंतर पालिकेला आर्थिक छळ सहन करावा लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली कुदळवाडीत 8 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. सुमारे एक हजार एकर परिसरातील तीन हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे, पत्राशेड्स महापालिकेने भुईसपाट केली आहेत. या कारवाईमुळे या भागातील व्यावसायिक, लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडून सरकार आणि महापालिका प्रशासनाविरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. मशिनरी, साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने व्यवहार ठप्प झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. या कारवाईने व्यावसायिक, उद्योजक आणि कामगारांचे मोठे नुकसान झाले. या कारवाईमुळे महापालिकेचीही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

महापालिकेने कारवाई केलेल्या बांधकामांपैकी शेकडो बांधकामांची महापालिका करसंकलन व करआकारणी विभागाकडे नोंद आहे. त्यांच्याकडून अनेक वर्षांपासून महापालिका मालमत्ताकर वसूल करते. चालू आर्थिक वर्षात येथील काही मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला होता. मात्र, तेथे झालेल्या सरसकट कारवाईत अनेक मालमत्ता पालिकेने पाडल्या. त्यांच्याकडून अंदाजे पालिकेला 60 कोटी रुपयांचा मालमत्ताकर जमा होणे अपेक्षित होते; परंतु कारवाईनंतर पालिकेला या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

व्यावसायिकांचे धनादेश करसंकलन विभागाकडे

■ चिखली-कुदळवाडीत ज्या भागात कारवाई झाली, तेथील अनेक मालमत्ताधारकांनी थकबाकी रक्कम भरण्यासाठी धनादेश पालिका करसंकलन विभागाकडे जमा केलेले आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर हा मिळकतकर वसूल होण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे हे धनादेश आता करसंकलन विभागात पडून असून, पालिकेला यातून मिळणाऱ्या महसुलाला मुकावे लागणार आहे. या धनादेशाची निश्चित आकडेवारी करसंकलन विभागाने जाहीर केली नाही; परंतु अनेक धनादेश जमा असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.