काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोटय़ा जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपने महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण हिमाचल प्रदेश, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडला. आम्ही गॅरेटी दिल्या आणि पूर्णही केल्या. काँग्रेस सरकारने गरीबांचे पैसे गरीबांनाच दिले तर भाजपला पोटदुखी का होते, असा सवाल यावेळी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केला.
टिळक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते. काँग्रेसने जाहीर केलेल्या या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे याची आकडेवारीसह सविस्तर माहिती देऊन भाजपचा खोटारडेपणा या नेत्यांनी उघडा पाडला.
ऑपरेशन कमळचा सामना
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू म्हणाले की, महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली.
स्वतंत्र तेलंगणाचे आश्वासन पूर्ण
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वतंत्र तेलंगणाचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी 6 गॅरंटी जाहीर केल्या होत्या. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्या आश्वासनांची पूर्तता केल्याचे रेड्डी म्हणाले.
कर्नाटकमध्ये आश्वासन पूर्ती
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकातील जनतेच्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यातूनच कर्नाटकात 6 गॅरंटी देण्यात आल्या. काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे डी. शिवकुमार म्हणाले.
महाराष्ट्राशी धोकेबाजी करणाऱया भाजपच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका
रेवंत रेड्डी, तेलंगणाचे मुख्यमंत्री
गॅरंटींच्या पूर्ततेसाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे. या गॅरंटीची पूर्तता करण्यासाठी महसूल उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत.
सुखविंदर सुख्खू, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
काँग्रेसच्या गॅरंटींची अंमलबजावणी पाहण्यासाठी भाजप नेत्यांनी कर्नाटकात यावे; विशेष विमान व बसेसची सोय करू.
डी. के. शिवकुमार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री