कर्नाटकातील कांग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेसच्या 50 आमदारांना 50-50 कोटी रुयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये भाजपची कधी स्वबळावर सत्ता आली नाही, ते ऑपरेशन लोटस करूनच सत्तेत आले, असा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला आहे.
हे पैसे कुठून येतात, हे पैसे येडियुरप्पा, बोम्मई, आर. अशोक यांनी छापलेत का? हे जे पैसे आहेत ज्याद्वारे राज्याला लुटण्यात आले आहे, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि राज्यपालांचा दुरुपयोग करून भाजप आमच्या विरुद्ध षडयंत्र करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पहिल्यांदा केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात आले आणि आता मला तसेच माझ्या पत्नीला लक्ष्य केले जातेय, असेही सिद्धरामय्या म्हणाले.
भाजप आणि पेंद्रापुढे झुकणार नाही
गेल्या 40 वर्षांपासून या क्षेत्रातआहे. काल परवापासून मुख्यमंत्री नाही. माझ्या विरोधात खोटय़ा केसेस दाखल केल्या जात आहे. राज्यातील जनता मूर्ख नाही, जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी भाजपा आणि पेंद्र सरकारच्या षडयंत्रापुढे झुकणार नाही, असा इशाराही सिद्धरामय्या यांनी दिला. काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी 50-50 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आमच्या आमदारांनी ती ऑफर धुडकावली, असे ते म्हणाले.