माफ करा, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

हे संपूर्ण वर्ष दुर्दैवी होतं. मला खेद वाटतो आणि गेल्या 3 मेपासून आजपर्यंत जे काही घडत आहे त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागू इच्छितो, मला माफ करा, अशा शब्दांत मणिपूरमधील हिंसाचारावर अखेर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली.

विविध घटनांमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे आणि अनेकांना आपले घर सोडून जावे लागले. याचा मला प्रचंड खेद वाटतो. मला सर्वांची माफी मागायची आहे, परंतु गेल्या तीन ते चार महिन्यांपासून राज्यात शांतता निर्माण करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन वर्षात मणिपूरमध्ये शांतता आणि समान्य स्थिती पुन्हा नांदू लागेल, असा विश्वासही एन बिरेन सिंह यांनी व्यक्त केला आहे.

सर्व जाती-जमातींनी एकत्र राहावे

सर्व मान्यता मिळालेल्या 34 ते 35 जमातींनी भविष्यातही एकत्र राहावे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे आणि चर्चा तसेच संवाद हाच त्याचा एकमेव मार्ग आहे, असेही सिंह यांनी म्हटले आहे. 3 मे 2023 पासून मणिपूरमध्ये आरक्षणावरून मैतेई आणि कुकी समुदायात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात 250 हून अधिक लोक मारले गेले तर हजारो लोक विस्थापित झाले, असे ते म्हणाले. नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत 345 गोळीबाराच्या घटना घडल्या, तर आतापर्यंत 12 हजार 47 एफआयआर नोंदवले गेले आणि 625 जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर 5 हजार 600 शस्त्रे आणि स्फोटकांसह मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत, माफी का मागत नाहीत? – काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात, जगभरात फिरतात, परंतु ते मणिपुरात का जात नाहीत? ते झालेल्या हिंसाचाराबद्दल आणि सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल माफी का मागत नाहीत, असा सवाल काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मणिपूरकडे दुर्लक्ष का करत आहेत, हे अद्याप मणिपूरमधील लोकांना कळलेले नाही. मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यापासून मोदी तिकडे फिरकले नाहीत, असे नमूद करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निशाणा साधला.