मिंधे सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात पॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळकावलेल्या जमिनीवर उद्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने अशा जमिनीवर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेऊ नये, अशी विनंती जमिनीचे मूळ मालक असलेल्या सिल्लोडच्या पठाण कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिल्लोड येथील शिवसेना भवनाच्या बाजूलाच लागून ही सर्व्हे नंबर 377 ची जमीन आहे. ही जमीन पठाण कुटुंबीयांची वडिलोपार्जित आहे, मात्र मंत्री सत्तार यांनी बळजबरीने त्या जमिनीवर कब्जा केला आहे. जमिनीवर त्यांनी बेकायदा बांधकामही केले आहे. 2021 मध्ये पठाण कुटुंबीय आणि सत्तार यांच्यात या जमिनीवरून वाद झाल्यानंतर ते प्रकरण दिवाणी न्यायालयात गेले. पठाण कुटुंबीयांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. तसेच महसूल विभागाकडेही अर्ज दाखल केले आहेत. तत्कालीन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पठाण कुटुंबीयांच्या बाजूने कायदेशीर निर्णय दिला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याकारणाने उच्च न्यायालय येथे संबंधित अधिकाऱयांच्या विरोधात अवमान याचिका प्रलंबित आहे. मंत्री सत्तार सातत्याने त्या अधिकाऱयांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे, असा गंभीर आरोप पठाण परिवारातील तय्यब खान बडेमिया पठाण यांनी केला आहे.