एमपीएससीसाठी वयोमर्यादेत वाढ होणार, मागणीला मुख्यमंत्र्यांकडून अनुकूलता

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षेसाठी बसण्यासाठी संधी देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना याबाबत लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळात 2020 ते 2021 या वर्षात सरकारी नोकरभरती ठप्प होती. त्यामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही. पण या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी राज्य शासनाने दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, अमृत महोत्सव काळात राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची घोषणा केली. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे, परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे व सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीची जाहिराती मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आचारसंहिता आदी तांत्रिक कारणांमुळे जाहिराती वेळेवर प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने परीक्षेपासून ते वंचित राहिले आहेत. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती, परंतु या विविध कारणांमुळे जाहिरात आयोगाने वेळेवर प्रसिद्ध केली नाही. जाहिरात नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले आहे.

देशातील आठ राज्यांनी व भारतीय रेल्वेने कोविडमुळे दिलेली तीन ते पाच वर्षे सरसकट वय मुदतवाढ-वय सूट दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारनेही अशीच संधी द्यावी या मागणीसाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या काळात विद्यार्थ्यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

यासंदर्भात महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील म्हणाले की, 31 डिसेंबर 2027 पर्यंत वयोमर्यादा वाढवण्याची आमची मागणी आहे. तसेच 5 जानेवारीची कंबाईन पूर्व परीक्षाही पुढे ढकलावी. नव्याने अर्ज करण्यासाठी लिंक ओपन करून द्यावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे.

राज्य शासनाने पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क या दोन्ही परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ करून लाखो विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाखो विद्यार्थी करीत आहेत. इतर राज्यांत राज्य शासनाने तीन ते पाच अशी सरसकट वयोमर्यादेत वाढ केली आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने केवळ दोन वर्षे सवलत दिली आहे. परंतु तांत्रिक अडचणीत जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने कमाल वयोमर्यादा ओलांडलेले विद्याथी अपात्र ठरले आहेत.