
झोपडपट्टीवासीयांना पुनर्विकास होऊन हक्काचे घर मिळावे म्हणून ‘एसआरए’च्या माध्यमातून काम होणे अपेक्षित असताना मिंधे सरकारच्या आशीर्वादाने झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात गेल्या अनेक वर्षांपासून मर्जीतले अधिकारी बस्तान मांडून बसले आहेत. यामध्ये प्रशासनाचे प्रतिनियुक्तीचे आदेश धाब्यावर बसवण्यात आले असून आता तर थेट अशा 30 टक्के अभियंत्यांना सेवेत ‘कायम’ करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या सर्वांमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बिल्डर मित्र आणि ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष अजय आशर यांचा हात असून त्यांच्यामार्फत मर्जीतल्या अधिकाऱयांना एसआरएमध्ये प्रतिनियुक्ती व मुदतवाढ दिली जात असल्याची चर्चा प्राधिकरणात आहे.
ज्या सरकारी अधिकाऱयांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांची तत्काळ बदली करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीआधी दिल्या होत्या. त्यातील काही अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या, पण एसआरएमध्ये प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाऱयांना राज्य सरकारने अजूनही हात लावलेला नाही.
फडणवीसांचा विरोध, पण ‘मित्रा’ची मदत
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मिटकर यांना मुदतवाढ देण्यास विरोध होता. त्यांच्या प्रतिनियुक्तीची फाईल जेव्हा सहीसाठी मंत्रालयात गेली तेव्हा ‘नियमानुसार करा’ असा शेरा मारण्यात आला. त्यानंतर मिटकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्र्यांचे ‘मित्र’ अजय आशरमार्फत एसआरएवर मुदतवाढ मिळवण्यात ते यशस्वी झाले.
नवरात्रीसाठी वर्गणी वसुली!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे भाजपचे आमदार एसआरएमधील अधिकाऱयांचे ‘लाड’ पुरवत असल्याची माहिती आहे. मध्यंतरी भाजप आमदारांच्या सांगण्यावरून एसआरएमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱयांनी नवरात्री मंडळासाठी बिल्डरांकडून वर्गणी गोळा केल्याची चर्चा होती.
ठाणे कनेक्शनमुळे ‘एसआरए’त ‘ठाण’ मांडले
मुंबई महापालिकेतील दोन-तीन कार्यकारी अभियंत्यांची एसआरएमध्ये प्रतिनियुक्ती झाली आहे. त्यातील एक महत्त्वाचे प्रस्थ म्हणजे कार्यकारी अभियंता मिलिंद वाणी असल्याचे सांगण्यात येते. मिलिंद वाणी ‘ठाणे कनेक्शन’ वापरून एसआरएमध्ये ‘ठाण’ मांडून बसले आहेत. ‘मित्रा’ची मर्जी संपादन केल्यामुळे एसआरएमध्ये प्रतिनियुक्ती मिळत असल्याची चर्चा आहे.
या अधिकाऱ्यांचे ठाण
– आर. बी. मिटकर: उपमुख्य अभियंता – 7 वर्षे, संध्या बावनकुळे: सहाय्यक निबंधक म्हणून एसआरएमध्ये – 5 ते 6 वर्षे, यू. सी. बोडके: कार्यकारी अभियंता – 4 ते 5 वर्षे, मिलिंद वाणी: कार्यकारी अभियंता – 7 वर्षे, प्रदीप पवार: आधी सहाय्यक अभियंता म्हणून ऑडिशनल चार्ज कार्यकारी अभियंता म्हणून 6 वर्षे होते. तक्रार झाल्यावर म्हाडामध्ये सहा महिने पुन्हा ‘एसआरए’मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून येऊन दोन ते अडीच वर्षे, गंगाधर घागरे:कार्यकारी अभियंता म्हणून 3 वर्षे एसआरएमध्ये, नंतर पालिकेत गेले. पुन्हा दोन वर्षांपूवी ‘एसआरए’मध्ये आले.