शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री लवकरच करणार पाहणी, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

दादर येथील महापौर निवासस्थानाच्या जागी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. स्मारकाचे काम वेगात सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत झालेल्या कामाची पाहणी आपण करावी, असे आमंत्रण शिवसेना नेते आणि स्मारकाचे सचिव सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ते आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले असून लवकरच मुख्यमंत्री स्मारकाच्या कामाची पाहणी करणार आहेत.

सुभाष देसाई यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. हा शासनाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आपण या, असे या भेटीत मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे देसाई म्हणाले.

पुढील वर्षी शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष असून 23 जानेवारी 2026 रोजी शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.