फडणवीस यांचे पुन्हा ‘एक है तो सेफ है’, पानिपतमधील शौर्यभूमीला केले वंदन

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘एक है तो सेफ है’, ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा देत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हरयाणातील पानिपत येथे जाऊन पुन्हा ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला. यावरून भाजपची धार्मिक ध्रुवीकरणाची भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत, हरयाणा येथील पानिपत शौर्य स्मारकास भेट दिली. या वेळी त्यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना विनम्र अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. या वेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यात अठरापगड जाती एकत्र होत्या. लोक एकत्र येऊन मावळे म्हणून लढले. त्यांनी स्वराज्य विस्तारीकरणाचे काम केले. आम्ही एकत्र राहिलो तर सुरक्षित आहोत. पुन्हा जाती-पातीमध्ये विभाजन झाले तर प्रगती करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंडय़ाखाली आम्हाला सर्वांना एकत्र आणले आणि हिंदुस्थानच्या तिरंग्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संधी मिळेल तेव्हा इथे येईन

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पानिपतला येणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणे हे माझे सौभाग्य मानतो. जेव्हा संधी मिळेल, इथे येत राहीन. आम्ही शौर्य भूमीला वंदन करण्यासाठी आलो, शौर्य भूमीच्या ट्रस्टचे मनापासून आभार मानतो. आमचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले, याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी मातृभूमीकरिता धारातीर्थी पडलेल्या मराठय़ांच्या शौर्याचे संवर्धन करण्याचे काम ट्रस्ट करत आहे. ट्रस्टसोबत माझी चर्चा झाली आहे. काही गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या आहेत. येथील स्मारक अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल, त्यासाठी जे आवश्यक असेल त्यात महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.