सरकारच्या प्रमुखांना भेटणे हे ‘डील’ नाही – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

न्यायाधीशांनी सरकारच्या प्रमुखांना भेटणे म्हणजे ‘डील’ नाही, असे भाष्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.गणेशोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेले होते. महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचे प्रकरण सर्वेच्च न्यायालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा सरन्यायाधीशांसोबत एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीशांनी सत्ताप्रमुख आणि न्यायाधीशांच्या भेटीबाबत वक्तव्य केले.

सण असेल किंवा दुःखाचा प्रसंग असेल तर न्यायाधीश वा सत्तेतील प्रमुख एकमेकांना भेटत असतात. पण न्यायपालिकेच्या कामकाजावर त्याचा प्रभाव पडत नाही. न्यायपालिका स्वतंत्र आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. सरकारच न्यायपालिकेसाठी बजेट देत असते. त्यामुळे त्यासंदर्भात केवळ पत्रव्यवहार करून चालत नाही. त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील त्यांची प्रत्यक्ष भेटही घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले.

माझ्यावर विश्वास ठेवा. सरकारचा प्रमुख आणि न्यायाधीशांची भेट झाली म्हणजे डील झाली असा अर्थ काढू नका. अशा भेटींत परिपक्वता असते. अशा बैठकांमध्ये कोणी मुख्यमंत्री प्रलंबित खटल्यावर बोलत नाही. प्रशासकीय कारणांसाठी अशा भेटी होत असतात.