अयोध्येचा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींवर मोदीकृपा, आता सरन्यायाधीशांना कोणते पद मिळणार? सोशल मीडियावर चर्चा

माझ्यावर विश्वास ठेवा. सरकारचा प्रमुख आणि सरन्यायाधीशांची भेट झाली म्हणजे डील झाली असा अर्थ काढू नका, असे भाष्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकतेच केले. त्यानंतर आता त्यांच्या विधानाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अयोध्येचा निकाल देणाऱ्या सर्व न्यायमूर्तींवर निवृत्तीनंतर मोदीकृपा झाली. आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना काय मिळणार, अशीही चर्चा आहे. दरम्यान, अयोध्येचा निकाल देणाऱ्या गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठात न्यायमूर्ती शरद बोबडे आणि धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश होता.

रंजन गोगोई सरन्यायाधीश असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर अयोध्याप्रकरणी सुनावणी झाली होती. 9 नोव्हेंबर 2019 रोजी राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर तोडगा काढत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला तसेच अयोध्येतच पर्यायी पाच एकर जागेवर मशीद बांधली जाईल असा निर्णय दिला. त्या स्थळी मशीद असली तरी भगवान राम यांचे जन्मस्थान मानल्या गेलेल्या त्या जागेवर हिंदूंना पूजा करण्यापासून रोखण्यात आले नाही. त्याच जागेवर रामाचा जन्म झाला, असा विश्वास हिंदूंना आहे आणि ती मशीदही त्यांचा हा विश्वास डळमळीत करू शकली नाही, असे गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले होते.

शरद बोबडे झाले एनसीएलटीचे अध्यक्ष

रंजन गोगोई हे सरन्यायाधीशपदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. अशोक भूषण यांनी 13 मे 2016 ते 4 जुलै 2021 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. सेवानिवृत्तीनंतर 5 महिन्यांनी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांची एनसीएलटी म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना काय मिळणार?

येत्या 10 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सेवानिवृत्त होत आहेत. गणेशोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले तसेच आरतीही केली. त्यानंतर महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील सरन्यायाधीशांसोबत मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे सरन्यायाधीश राजकारणात जाणार का? अयोध्येच्या बाजूने निकाल देणाऱ्या गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठामध्ये असणाऱ्या इतर न्यायमूर्तींप्रमाणेच धनंजय चंद्रचूड यांच्यावरही मोदीकृपा होणार का, असे सवाल आता सोशल मीडियातून विचारले जात आहेत.

गोगोई यांना राज्यसभेचे बक्षीस

रंजन गोगोई यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ते 17 नोव्हेंबर 2019 रोजी निवृत्त झाले. गोगोई यांची त्यानंतर राज्यसभेसाठी निवड करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. राष्ट्रपती नामनिर्देशीत खासदार म्हणून गोगोई यांची निवड झाली.

एस. अब्दुल नजीर आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी

न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर हे 17 फेब्रुवारी 2017 ते 4 जानेवारी 2023 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सेवानिवृत्तीनंतर अवघ्या महिन्याभरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.