‘छावा’तील आक्षेपार्ह भाग वगळा; अन्यथा चित्रपटगृहे बंद पाडू! ‘महाराणी येसूबाई फाऊंडेशन’चा इशारा

“छावा’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. राज्यभर आंदोलन छेडून थिएटर बंद पाडू,’ असा इशारा ‘महाराणी येसूबाई फाऊंडेशन’चे प्रमुख सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेचे ते बोलत होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाईसाहेब या इतिहासातील सर्व व्यक्तिरेखा म्हणजे महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहेत. मात्र, मालिका चित्रपटांमध्ये या व्यक्तिरेखांचे सादरीकरण मनोरंजक पद्धतीने केले जातेय. फक्त ‘टीआरपी’ वाढवण्याच्या उद्देशाने इतिहासाची मोडतोड केली जातेय. ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली चाललेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे हे चारित्र्यहनन आम्ही खपवून घेणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

सुहास राजेशिर्के म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट येऊ घातला आहे. याचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अत्यंत उथळपणे मांडलेली दिसते. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी महाराणी येसूबाईसाहेब यांची व्यक्तिरेखाही वास्तवाला धरून नाही. या टीझरमध्ये काही गाण्याचा भाग दाखवला आहे, ज्यात छत्रपती संभाजी महाराज जिरेटोप घालून आपल्या पट्टराणीसमवेत लेझीम या पारंपरिक खेळातून नाचताना दाखवलेले आहेत. वास्तविक पाहता, लेझीम हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक खेळ नसून, कधीकाळी तो एक व्यायामप्रकार म्हणून प्रसिद्ध होता. कदाचित चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा याबाबत अभ्यास नसावा.’

‘छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या प्रतिकूल परिस्थितीत झाला, त्या परिस्थितीचा अभ्यास दिग्दर्शकांनी करायला हवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी चाललेले महाभारत, स्वकीयांनी आणि परकीयांनी टाकलेले डाव छत्रपती संभाजी महाराजांनी उधळून लावले. अत्यंत कठोर निर्णय घेत स्वतः विरुद्ध चाललेला कट हाणून पाडत आपला राज्याभिषेक करून घेतला. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला तर छत्रपती संभाजी महाराजांचा लेझीम डान्स, तसेच फिल्मी हीरो स्टाइलने कपडे झटकण्याची लकब या गोष्टी कधीही वास्तवाला धरून दिसत नाहीत,’ असे राजेशिर्के म्हणाले.

‘दुसरा मुद्दा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईसाहेबांचा. येसूबाईसाहेब या तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून नेमणुकीत होत्या. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत धीरगंभीरपणे साथ दिली. तत्कालीन मराठा समाजात सर्वसामान्य स्त्री- पुरुषांचे एकत्र नाचकाम कधी होत असेल अशी आपली परंपरा नाही. मग या तर स्वतः कुलमुखत्यार. तसेच छत्रपतींच्या पट्टराणी होत्या. त्यामुळे या चित्रपटामध्ये दाखवलेला असला खुळचट प्रकार घडला असेल यावर महाराष्ट्रातील जनता कधीच विश्वास ठेवणार नाही. चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाने फक्त मनोरंजन एवढाच विचार करून या चित्रपटाची मांडणी केलेली दिसते,’ असेही शेवटी सुहास राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.