
>> प्रभा कुडके
फाड देंगे मुघल सलतनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुररत की, हम शोर नहीं सिधा शिकार करते है’ अशा दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शनसह स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजीराजेंचा जीवनपट म्हणून ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून 2025 वर्षाची सुरुवात एका भव्यदिव्य चित्रपटाने होणार आहे. ‘छावा’ सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच तब्बल दोन लाख तिकिटांची विक्री करण्यात यश मिळवले आहे यावरूनच चित्रपटाचा बोलबोला लक्षात येत आहे. या चित्रपटातील काही साहसी दृश्यांसाठी बल्गेरिया देशातून जूजी या नामांकित स्टंट मास्टरला पाचारण करण्यात आले होते, तर अभिनेता विकी काwशल याला घोडेस्वारी शिकवण्यासाठी कझाकिस्तानमधून एका घोडेस्वार प्रशिक्षकाची नेमणूक केली होती. चित्रपटातील 90 टक्के साहसी दृश्ये आपल्या हिंदुस्थानातील ख्यातनाम स्टंट दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेली आहेत.
दैनिक ‘सामना’सोबत बोलताना या चित्रपटाचे मुख्य स्टंट दिग्दर्शक परवेज शेख म्हणाले, इतिहासकालीन युद्ध दृश्यांचे चित्रीकरण करणे हेच या चित्रपटातील मुख्य आव्हान होते. युद्धाच्या बहुतांशी दृश्यांचे चित्रीकरण करण्यासाठी पहाटे 4 वाजता 1500 चा जमाव जमवावा लागायचा. सूर्यादयाच्या आधी काही दृश्ये चित्रित करावी लागायची. त्यामुळेच ठरावीक वेळेत चित्रीकरण करणे गरजेचे होते. अवघे काही सेपंदांचे क्षण चित्रीकरण करण्यासाठी जवळपास 15 दिवसांचा कालावधी लागल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
108 किलोचा अभिनेता, 18 किलोची तलवार
सिनेमातील धर्मवीर संभाजीराजे ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेता विकी कौशल याने तब्बल 108 किलो वजन या व्यक्तिरेखेसाठी वाढवले होते. केवळ इतकेच नव्हे तर ‘छावा’तील सर्व स्टंट हे विकी काwशल याने स्वतः साकारले आहेत. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे विकी काwशलने 18 किलोची तलवार हातात घेऊन सर्व साहसी दृश्ये सादर केली आहेत.
युद्धाच्या शूटिंगसाठी लागले 7 महिने
चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे युद्धाचे चित्रीकरण होते. हे चित्रीकरण करण्यासाठीच तब्बल 7 महिन्यांचा कालावधी लागला होता. एरवी साहसी दृश्यांसाठी कलाकाराच्या जागी कुणीतरी दुसरा स्टंट आर्टिस्ट ती दृश्ये साकार करत असतो, परंतु या चित्रपटातील सर्व साहसी दृश्ये ही विकी काwशलने देश-विदेशातील तज्ञांच्या सहाय्याने सादर केली आहेत.