गरीब शेतकऱ्याची लेक झाली लेफ्टनंट

प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता ध्येय गाठायचे, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे… छत्तीसगढच्या वीणा साहूमडे हिने असाच आदर्श घालून दिला. बलोड जिह्यातील जमरुवा गावातील ही शेतकरी कन्या. शेतकरी चेतन साहूमडे यांची लेक. आज अथक प्रयत्नांतून तिने स्वतःचे लष्करात भर्ती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सध्या ती  अंबाला येथील मिलिटरी नार्ंसग ऑफिसर म्हणून तैनात आहे.

छत्तीसगडच्या दुर्गम खेडय़ात वाढलेल्या वीणाचा प्रवास खडतर राहिला. तिचे कुटुंब आर्थिक अडचणींना तोंड देत होते, परंतु वीणाने शिक्षणाची कास सोडली नाही. शाळेत जाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर सायकल चालवायची. उच्च शिक्षणासाठीही तिने असाच प्रवास केला. तीन महिन्यांच्या डय़ुटीनंतर वीणा जेव्हा घरी आली तेव्हा संपूर्ण गावाने तिचे जोरदार स्वागत केले. या वेळी तिच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. ‘मुलगी लेफ्टनंट झाल्याचा आनंद मोठा आहे. कुटुंबासह तिने संपूर्ण गावाचीच मान अभिमानाने उंचावली आहे’ असे वीणाचे वडील म्हणाले.

‘माझे वडील उच्च शिक्षण घेऊ शकले नाहीत, पण त्यांनी मला नेहमीच प्रेरणा दिली. मेहनत ही यशाची मोठी गुरुकिल्ली आहे,’ असे वीणाने म्हटले.