टीव्ही मालिका पाहून तांत्रिकाने दोघांचा काटा काढला, पण तिसऱ्याला संपवण्याच्या तयारीत असतानाच पर्दाफाश

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीव्ही मालिका पाहून एक तांत्रिक लोकांकडून पैसे उकळून मग त्यांची हत्या करायचा. मात्र मयत व्यक्तींच्या शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे निष्पन्न व्हायचे. अखेर या तांत्रिकाचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुखवंत साहू असे अटक केलेल्या तांत्रिकाचे नाव आहे. सावधान इंडिया ही मालिका पाहून आरोपीने प्लान करून हे कृत्य केले.

काय आहे प्रकरण?

धानोरा येथील रहिवासी असलेला सुखवंत साहू हा स्वतःला तांत्रिक असल्याचे सांगत लोकांकडून समस्या सोडवण्याच्या बहाण्याने पैसे उकळायचा. पैसे घेतल्यानंतर पूजा-पाठ करून प्रसाद म्हणून सायनाइड मिसळलेले पाणी प्यायला द्यायचा. हे पाणी प्यायल्यानंतर भक्ताचा मृत्यू व्हायचा. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे निष्पन्न व्हायचे.

‘असा’ झाला पर्दाफाश

तांत्रिकाला या कामात त्याचा मित्र वीरेंद्र दिवांगण मदत करायचा. एके दिवशी तांत्रिक आणि वीरेंद्र दिवांगण यांच्यात पैशाच्या वाटपावरून वाद झाला. यानंतर आरोपीने त्याचा सहकारी वीरेंद्र याची हत्या केली, मात्र यावेळी त्याने हत्येसाठी सायनाइडचा वापर केला नाही. यावेळी तांत्रिकाने डोके ठेचून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी तांत्रिकाला अटक केली.

पोलिसांनी तांत्रिकाची कसून चौकशी केली असता त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. हत्येची पद्धत आणि पोलिसांपासून बचाव करण्याची युक्तीही तांत्रिकाने पोलिसांना सांगितली.