
गडचिरोली जिह्यातील जरावंडी क्षेत्रात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 जहाल नक्षलवादी मारले गेले. यात सात पुरुष आणि पाच महिलांचा समावेश असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. दरम्यान, या मोठय़ा कारवाईमुळे उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवर तब्बल 86 लाखांचे बक्षीस होते. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून 28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान होणाऱया नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. तीन डीव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह पाच एसीएम आणि चार दलम सदस्य यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. गडचिरोलीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने कोरची टिपागड आणि चातगाव कसनसूर दलमचे 12 ते 15 माओवादी छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावाजवळच्या जंगलात तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाची सात पथके तत्काळ रवाना करण्यात आली.
अशी उडाली चकमक
जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना शस्त्रs खाली ठेवून शरण येण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल आणि स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.