छत्तीसगडच्या बीजापुर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी डिफ्युज करताना मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या सर्व जवानांची अवस्था आता स्थिर आहे. बीजापुरच्या तर्रेम येथील चिन्नागेलूक परिसरात डिमायनिंगसाठी निघालेल्या सीआरपीएफच्या 153 व्या बटालियनच्या जवानांनी नक्षलवाद्यांनी लावलेले आयआयडी सापडले होते. त्याला सीआरपीएफच्या बीडीएस टीम डिफ्यूज करत असताना आयईडीचा स्फोट झाला.
जखमी जवानांमध्ये असिस्टंट कमांडेट वैद्य संकेत देवीदास, इन्स्पेक्टर संजय कुमार, कॉन्स्टेबल पवन कल्याण, लच्छन महतो आणि ढोले राजेंद्र अशूर्बा सहभागी आहेत. सध्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरु आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून जवानांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयईडी ठेवले जात आहेत.
बिजापुरचे एसपी जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले की, सीआरपीएफचे जवान डिमायनिंगसाठी निघाले होते. आयईडी डिफ्यूज करण्यादरम्यान स्फोट झाला आणि जवान जखमी झाले. सर्व जवानांची हालत स्थिर आहे.