छत्तीसगडमध्ये लव्ह ट्रॅंगल, तरुणाने केली प्रेयसीच्या एक्स बॉयफ्रेण्डची केली हत्या

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यामध्ये लव्ह ट्रॅंगलमधून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. एका तरुणाने आपल्या मित्रांसोबत मिळून प्रेयसीच्या पहिल्या प्रियकराला लाठी काठीने एवढे मारले की त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आता मुलीसह पाच संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

ही घटना दुर्ग शहरातील पद्मनाभपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिव्हिल लाईन परिसरात घडली. या घटनेचा तपास सुरू आहे. ही संपूर्ण हत्या म्हणजे लव्ह ट्रॅंगल आहे. येथे राहणाऱ्या तरुणीचे चेतन साहू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. चेतन आणि मुलगी या दोघांच्याही आई पोलीस विभागात आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या आईची सुरगुजा येथे बदली झाली होती. मुलगीही सुरगुजा येथे गेली. तिथे सुरगुजा येथे राहणाऱ्या लुकेश साहूकडे तिची मैत्री झाली आणि मग प्रेमात रुपांतर झाले. दरम्यान, दुर्ग येथील चेतन तिला सातत्याने फोन करु लागला होता, त्याला ती त्रासली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी 24 डिसेंबर रोजी आईसोबत दुर्ग येथे आली होती. चेतनला त्याची प्रेयसी दुर्ग येथे आल्याचे समजताच त्याने भेटण्यास सांगितले. मात्र तिने भेटायला नकार दिल्याने तो तिला त्रास देऊ लागला. मुलीने दुर्ग येथील तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर चेतन याच्याबाबत सुरगुजा येथील प्रियकर लुकेश साहू याला सांगितले. यानंतर लुकेशने तिला चेतनला भेटायला बोलावण्यास सांगितले. लुकेशने सांगितल्याप्रमाणे तरुणीने चेतनला सिव्हिल लाईन परिसरातील घराजवळ भेटण्यासाठी बोलावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुलीला भेटण्यासाठी पोहोचला. याआधीच लुकेश त्याच्या मित्रांसह तिथे होता. चेतन आल्यानंतर दोघांमध्ये मुलीवरुन वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की लुकेशसह त्याच्या साथीदारांनी चेतनला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. त्यात चेतनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पद्मनाभपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले. रात्रीच चेतनचा मृतदेह शवागारात पाठवण्यात आला. त्याचवेळी पोलिसांनी रात्रीच पाच संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तरुणीलाही ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.