![Chhattisgarh](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Chhattisgarh--696x447.jpg)
छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गोळीबारात दोन जवान शहीद, तर दोन जवान जखमी झाले. बिजापुरातील इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात ही चकमक उडाली. दरम्यान, सर्वच्या सर्व 31 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून इंद्रावती नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांची शोधमोहीम जारी आहे.
सुरक्षा दलांचे तब्बल 650 हून अधिक जवान इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या निर्धाराने विखुरले गेले होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर देत तुफान गोळीबार सुरू केला. या चकमकीत कॉन्स्टेबल वसित रावोटे आणि हेड कॉन्स्टेबल नरेश ध्रुव हे दोन जवान शहीद झाले. तर दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना एअरलिफ्ट करत रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा आणि स्फोटके हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
आज सकाळी डीआरजी अर्थात जिल्हा राखीव रक्षक आणि एसटीएफ अर्थात विशेष कृती दलाच्या जवानांनी संयुक्तपणे नक्षलवादविरोधी मोहीम राबवली. यात राज्य पोलिसांची विविध युनिट्सदेखील सहभागी झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
अमित शहा यांचा पुन्हा नक्षलवादमुक्तीचा नारा
नक्षलमुक्त हिंदुस्थान करण्याच्या दिशेने छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहेत. आज आपण मानवताविरोधी नक्षलवाद संपवताना आपले दोन शूर सैनिक गमावले. देश या वीरांचा सदैव ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रति मी मनापासून संवेदना व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वरून दिली आहे. तसेच 31 मार्च 2026 पूर्वी आपण या देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू, जेणेकरून देशातील एकाही नागरिकाला यामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असा संकल्प असल्याचे अमित शहांनी म्हटले आहे.
- कारवाईत एके-47, आयएनएसएएस, एसएलआर आणि 303 रायफल्स तसेच बॅरल ग्रेनेड लाँचर आणि मोठ्या प्रमाणावर स्फोटके घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
38 दिवसांत 81 नक्षलवाद्यांना धाडले यमसदनी
छत्तीसगडमध्ये या वर्षात आतापर्यंत 81 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. यात 65 नक्षलवाद्यांचा बस्तर येथे खात्मा करण्यात आला. 2024 मध्ये वेगवेगळय़ा चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल 217 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडल्याचे सांगण्यात येत आहे.