छत्रपती शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलला हजारो रसिकांचा भरभरून प्रतिसाद; समारोपादिवशी प्रदर्शनला शिवप्रेमींची गर्दी, खवय्यांची झुंबड

‘उत्सव कलेचा, मुंबईकरांच्या मनातला’ अशी बिरुदावली मिरवणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलच्या आजच्या समारोपाच्या दिवशी शिवप्रेमींनी ‘दर्यापती शिवराय’ या प्रदर्शनाला तर खवय्यांनी महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा भरपेट आस्वाद घेत महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान, समारोपादिवशी थ्री मोन्क्स बॅण्डने रसिकांचे मनोरंजन केले, तर महाविद्यालयीन मुलांसाठी आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित लॅण्डस्केप स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’चे यंदाचे हे चौथे वर्ष असून ‘मराठी संस्कृतीचे केंद्र असलेल्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच शिवसेना सचिव आणि ‘वेध’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून गेले चार दिवस चाललेल्या महोत्सवाला रसिकांना भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा यांची महापर्वणी होती तर या वर्षी ‘दर्यापती शिवराय’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुस्थानी नौदल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान सांगणाऱया प्रदर्शनाला हजारो मुंबईकरांनी आणि शिवप्रेमींनी भेट दिली. प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाऊ युद्धनौकांच्या प्रतिकृती, मराठय़ांचा समुद्री लढायांचा इतिहास, शिवछत्रपतींच्या जगप्रसिद्ध जगदंबा तलवार बनलेल्या पंपनीतील जुन्या शिवकालीन तलवारी, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची शिवरायी, इंग्रजांची शिवकालीन नाणी, अली आदिलशाहाचे ‘लारी’ नावाचे अत्यंत दुर्मिळ व वैशिष्टय़पूर्ण नाणे, सिंधुसागरात बांधलेले छत्रपती शिवरायांचे अभेद्य दुर्गांचे ड्रोन छायाचित्र मुंबईकरांना पाहायला मिळाले.

मुलांसाठी कला शिबीर

व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱयांसाठी तसेच कलेची आवड असणाऱया खरेदीदारांसाठी ‘निर्मिती’च्या माध्यमातून नानाविध कलेच्या ब्रँड्सचे, कलात्मक वस्तूंचे स्टॉल वनिता समाज येथे होते. पालक आणि छोटय़ा चिमुकल्यांसाठी समुद्रालगत चार दिवसांच्या गमतीजमती, मजामस्ती आणि अनेक अर्थपूर्ण आनंदाने भरलेली कलाशिबीर घेऊन ‘किड्स कार्निव्हल’ खाद्यपदार्थांच्या रेलचेलसह खास आकर्षण ठरले.
कला, संस्कृतीची रेलचेल

मुंबई महापालिका क्रीडा भवन येथे ‘मुंबई फूड फेस्ट’च्या निमित्ताने अस्सल खाद्य महोत्सवाची मेजवानी, सृजनशील कलाकृती, रसिकांना मुग्ध करणारी आणि संगीताच्या तालावर थिरकायला लावणारी अभंग रिपोस्ट, थ्री मोन्क्स बॅण्ड, ‘गोव्याच्या किनाऱयावर’फेम शुभांगी केदार यांनी मनोरंजन केले.