शिवाजी महाराजांचे स्मरण व्हावे आणि जागरण व्हावे म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सर्व शोधून काढलं. वगैरे, वगैरे… अशा संदिग्ध विधानांतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकमान्य टिळक यांना महाराजांची समाधी शोधून काढल्याचे श्रेय दिल्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे.
मिलिंद पराडकर यांच्या ‘तंजावरचे मराठे’ या पुस्तकाचे सोमवारी पुण्यात मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचे श्रेय लोकमान्य टिळकांना दिल्यानंतर भाजप नेते गडबडले असून, इतर काही पक्षाच्या नेत्यांसह इतिहास संशोधकांनी टीका केली आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची टीका
रायगडावरील समाधीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख संदिग्ध बोलले आहेत. इतिहास बघितला तर 1869 मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला. समाधीची अवस्था बघून पुण्यात आल्यानंतर अर्वाचीन इतिहासातील सर्वात मोठा पोवाडा देखील महात्मा फुले यांनी लिहिला. महाराजांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराची चळवळदेखील महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केली. त्यासाठी पुण्यात खास सभाही घेतली. लोकमान्य टिळकांचे सहकारी असलेल्या केळकर यांच्यादेखील आत्मचरित्रात याचे उल्लेख आढळतात. हा अभ्यास आदरणीय भागवत सरांनी केलेला दिसत नाही, असा चिमटा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काढला.