लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’ मध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे विविध अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींनी म्हटले आहे. त्यासंबंधीचे पुरावेही दिले आहेत. ही वाघनखे ठेवण्यासाठी ब्रिटनमध्ये 18 व्या शतकात बनविलेल्या डबीवरही अफजलखानाला मारण्यासाठी शिवरायांनी ही वाघनखे वापरल्याचा उल्लेख आहे. ब्रिटिश वृत्तपत्रांनीही वाघनखे शिवरायांचीच असल्याचा उल्लेख करीत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सर्वांच्या आधारावर ती वाघनखे शिवरायांचीच असल्याचा दावा केला.

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’मध्ये असलेली वाघनखे शिवरायांची नसल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी माहितीच्या मुद्दय़ाद्वारे वाघनखांच्या संदर्भात निवेदन करण्याची मागणी केली.

त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’ मध्ये असलेली वाघनखे शिवरायांचीच असल्याचे काही संदर्भ शिवप्रेमींनी सरकारला दिले आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या वेबसाईटवरही ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे संदर्भ दिले आहेत. 18 व्या शतकातही ही वाघनखे छत्रपती शिवरायांची असल्याची वृत्ते ब्रिटनमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ही वाघनखे मिळावीत यासाठी महाराष्ट्र सरकारने देशाचे  पंतप्रधान, ब्रिटनचे पंतप्रधान आणि ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’ यांच्याशी पत्रव्यवहार केला. प्रथम ही वाघनखे एक वर्षासाठी देण्यात येणार होती, मात्र त्यानंतर तीन वर्षांकरिता देण्याचा निर्णय झाला.

ही वाघनखे आणण्यासाठी कोणतेही भाडे दिलेले नाही. फक्त वाघनखे आणण्यासाठी एका दिवसाच्या जाण्या-येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये इतकाच खर्च झाला आहे. वाघनखे ठेवण्यासाठी 7 कोटी खर्च येणार आहे, असे म्हटले जात आहे, मात्र हा खर्च ज्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रे ठेवण्यात येणार आहेत त्या संग्रहालयाच्या डागडुजीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

19 जुलैला वाघनखे साताऱ्यात

19 जुलै रोजी सातारा येथील संग्रहालयात सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन घेता येईल. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, सरदार आणि त्यांच्या वंशजांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या संग्रहालयाचे उद्घाटनही यावेळी होणार आहे. लवकरच शिवराज्याभिषेकाची माहिती देणारी पुस्तिका शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुनगंटीवार खोटे बोलताहेत

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सुधीर मुनगंटीवार खोटे बोलत असल्याचे सांगितले. मुनगंटीवारांनी म्हटल्यानंतर इतिहास होत नसतो. इतिहास हा कागदपत्रांच्या आणि पुराव्याच्या आधारावर मांडावा लागतो. त्या संग्रहालयात असणाऱ्या सहा वाघनखांपैकी 1971 मध्ये नेलेली वाघनखे हे सरकार आणत आहे. ती वाघनखे शिवाजी महाराजांची नाहीत असे ज्यांच्याकडे ती वाघनखे आहेत त्यांनीच स्पष्टपणे म्हटलेले आहे. मग मुनगंटीवार कशाच्या आधारावर म्हणतात ती वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत? त्यांच्याकडे पुरावे असतील तर लोकांकडे मांडावेत. मुनगंटीवार यांनी मागच्या वेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक वर्ष अगोदर केला आहे.  ते जाहीर चर्चेला येणार आहे का ? त्यांनी समोरासमोर यावे मग त्यांना विचारतो काय पुरावे आहेत ? त्यांना चर्चेचे मी आव्हान देतो. कारण ज्यांच्याकडून तुम्ही वाघनखे आणतात ते म्युझियमच सांगत आहे की, ती वाघनखे शिवाजी महाराजांची नाहीत. विधासभेच्या सभागृहात ते धडधडीत कसे काय खोटे बोलू शकतात, असा सवाल त्यांनी केला.