महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व, शिवशंभू शौर्यगाथा, शाहिरी, व्याख्यान, स्पर्धा 

शिवजयंतीनिमित्त पालिकेच्या वतीने 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवशंभू शौर्यगाथा’ या महानाट्यासह ‘शाहिरीतून शिवदर्शन’, ‘सन्मान शिवरायांचा – रंग शाहिरी कलेचा’, ‘काव्यमय समाज प्रबोधन’, विविध विषयांवर व्याख्याने, ‘ढोल पथक वादन’, ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवनावर आधारित शाहिरी’, ‘जागर शिवचरित्राचा’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (शनिवार) सायंकाळी 5.30 वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प उद्यान येथे होणार आहे. त्यानंतर निगडीत ‘शाहिरीतून शिवदर्शन’ हा पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम शाहीर रामानंद उगले व त्यांचे सहकारी सादर करतील. रात्री 8 वाजता ‘असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच रविवारी ‘सन्मान शिवरायांचा रंग शाहिरी कलेचा’ हा शाहीर जळगाव येथील समाजभूषण शाहीर शिवाजीराव पाटील यांचा कार्यक्रम, तर रात्री 8 वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्याते उद्धव शेरे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. नियोजित महापौर निवास, अ प्रभागाजवळ, निगडी येथे ‘शिवशंभू शौर्यगाथा’ हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 17ते 19 फेब्रुवारी याकाळात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत होणार आहे.

चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगरमध्ये कमलनयन बजाज शाळेजवळ 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ‘काव्यमय समाज प्रबोधन’ हा कार्यक्रम होणार असून त्याचे सादरीकरण सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत (अकोला) व त्यांचे सहकारी करणार आहेत. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7वाजता ‘आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या शिवचरित्रकार आकाश भोंडवे यांचे व्याख्यान, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कवी-गायक, व्याख्याते संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होणार आहे, तर येथील कार्यक्रमाचा समारोप 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ‘ढोल पथक सादरीकरण’ कार्यक्रमाने होणार आहे.

डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज शिल्प उद्यान येथे 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांचा शाहिरीचा कार्यक्रम होणार असून, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयावर दस्तगीर अजीज काझी यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप 19 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता ‘जागर शिवचरित्राचा’ या विषयावर शिवव्याख्याते तात्यासाहेब मोरे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.