मालवणातील शिवपुतळ्याची उद्या पायाभरणी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी होणार आहे. या पुतळ्याची तलवारीसह उंची 83 फूट राहणार आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झालेले असून या चबुतऱ्यासाठी स्टेनलेस स्टील प्रकारातील लोखंड महाराष्ट्रात प्रथमच वापरण्यात आले आहे. या पुतळ्याचे स्ट्रक्चरल व इंजिनियरिंग संकल्पन विख्यात संरचना तज्ञ प्रा. जहांगीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पुतळा समुद्र- किनारी उभारण्यात येत असल्याने स्ट्रक्चरल ऍनालिसीस करताना हा पुतळा 200 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे झेलू शकेल याचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती  कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली.