निविदा प्रसिद्ध झाली… 20 कोटींचा खर्च, मालवणात राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फुटांचा भव्य पुतळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सुमारे वीस कोटी रुपये खर्च करून शिवरायांचा पुतळा उभारण्याची योजना आहे. मुख्य म्हणजे शिवरायांचा नवीन पुतळा 100 वर्षे टिकेल अशी अट घालण्यात आली आहे.

नौदल दिनानिमित्त मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटी पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी कंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होत, मात्र आठ महिन्यांतच 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेनंतर पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची टीका विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केली. त्यामुळे महायुती सरकार प्रचंड अडचणीत आले आहे. त्यामुळे सरकारने नवीन पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर नवीन पुतळा उभारण्यासाठी कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभाग कार्यकारी अभियंत्यांनी निविदा प्रसिद्ध केली आहे.

 

सहा महिन्यांत पुतळा उभारणार

निविदांमधील अटींनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे वीस कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याची उंची साठ फूट असेल.

पुतळ्याची 100 वर्षांची गॅरेंटी

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची 100 वर्षांची गॅरेंटी असावी अशी अट या निविदेत टाकण्यात आली आहे. पुढील दहा वर्षे पुतळ्याची देखभाल संबंधित कंत्राटदाराने करायची आहे. प्रत्यक्षात पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी तीन फुटांचे फायबर मॉडेल तयार करून त्या मॉडेलला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. आयआयटी पवईच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभवी शिल्पकाराला हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येईल अशी अट घालण्यात आली आहे.