शिवरायांच्या अवमानप्रकरणी शिवसेना आक्रमक; शिवप्रेमींकडून मालवण बंदची हाक

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी पूर्णत: कोसळला. या घटनेवरून सध्या शिवप्रेमींमध्ये मिंधे सरकारविरोधात संतापाची लाट आहे. दरम्यान या प्रकाराविरोधात शिवसेनेसह सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. शिवप्रेमींकडून बुधवारी 28 ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या घटनेवरून शिवप्रेमी आणि सामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी आज मालवणात जनआक्रोश मोर्चा काढून निषेध नोंदवणार आहे. या मोर्चात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री अशा मिंधे सरकारमधील प्रत्येकानेच या घटनेची जबाबदारी झटकून नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत तो पुतळा राज्य सरकारने नव्हे तर नौदलाने उभारला होता असे या मंत्र्यांकडून सांगितले जात आहे.

भ्रष्टाचाराची पोलखोल करणार, वैभव नाईक कोर्टात जाणार 

सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नऊ महिन्यांतच कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीतील मोठा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला. या संपूर्ण भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार वैभव नाईक कायदेशीर लढा देणार आहेत. या लढय़ात अॅड. असीम सरोदे निःशुल्क कायदेशीर मदत करणार आहेत. आमदार वैभव नाईक यांनी पुतळा उभारणीतील महायुतीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सगळे कायदेशीर मार्ग वापरून राजकोट किल्ल्यावरील प्रकाराला कारणीभूत असलेला भ्रष्टाचार उघड करणार आहे, असे  वैभव नाईक यांनी जाहीर केले आहे.

सिंधुदुर्गात संतप्त पडसाद; महाविकास आघाडीचे आंदोलन

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर कोकणवासीयांमध्ये प्रचंड संताप आहे. त्याचे पडसाद संपूर्ण सिंधुदुर्गात आज उमटले. महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळय़ाला आज शिवसैनिकांच्या वतीने दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करण्यात आला.