शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना, चेतन पाटीलला जामीन

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला सल्लागार चेतन पाटीलला उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.

सिंधुदुर्ग येथील या ऐतिहासिक किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऍागस्ट 2024 रोजी अचानक कोसळला. या दुर्घटनेच्या नऊ महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळय़ाचे अनावरण केले होते. 30 ऍागस्टला पाटीलला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली.  न्या. अनिल किल्लोर यांच्या एकलपीठासमोर पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. पाटीलची स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्याचा या दुर्घटनेतील सहभाग तूर्त तरी स्पष्ट होत नाही, असे नमूद करत न्यायालयाने पाटीलला जामीन मंजूर केला.

आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

शिल्पकार व कंत्राटदार जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवार, 25 नोव्हेंबरला सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारल्याने आपटे व पाटीलने उच्च न्यायालयात धाव घेतली.