संतापजनक; मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केंद्र सरकारने ठरवला ‘अडथळा’!

छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंबई विमानतळावरील तेजस्वी पुतळा केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ‘अडथळा’ ठरवून नोटीस बजावल्याने शिवप्रेमींसह अवघ्या महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा पुतळा 2016 मध्ये विमानतळाचे नूतनीकरण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ विमानतळ प्रशासनाकडूनच उभारण्यात आला आहे.

‘डीजीसीए’च्या माध्यमातून मुंबईच्या फनेल झोन परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये झोपड्या, इमारतींची पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणानंतर अडथळा ठरणाऱया सर्व इमारतींना विमानतळ प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ालाही नोटीस बजावण्यात आली आहे.

  • ज्या वेळी विमानतळाचे नूतनीकरण झाले तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने हा पुतळा उभारला होता त्या वेळी जीव्हीके कंपनीकडे विमानतळाचे व्यवस्थापन होते. विमानतळाचे व्यवस्थापन अदानीकडे आल्यानंतर आता थेट शिवरायांचा पुतळा हटवण्याचे कारस्थान सुरू झाले आहे. डीजीसीएच्या नोटीसने त्याचा पर्दाफाश झाला आहे.

पुतळा हटवू देणार नाही

फनेल झोनच्या नावाखाली सांताक्रुझ-पार्ल्यातील रहिवाशांना बेघर करण्यासाठी केंद्र सरकारला हाताशी धरून अदानीकडून हे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे, मात्र आम्ही पुतळा हटवू देणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱयांनी घेतली आहे.