छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला उदंड प्रतिसाद

मुंबईकरांच्या उदंड प्रतिसादात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. त्यांनी कला महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेले ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन पाहिले. तसेच कला महोत्सवात सहभागी कलावंतांशी संवाद साधला. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, आमदार महेश सावंत आणि अन्य शिवसेना नेत्यांनी कला महोत्सवाला भेट दिली.

लज्जतदार खाद्यसंस्कृतीची पर्वणी

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. कला महोत्सवातून महाराष्ट्राच्या कला, संस्कृती-परंपरेचे दर्शन होत आहे. खाद्यसंस्कृती हा तर जिव्हाळय़ाचा विषय. महाराष्ट्रात दर कोसावर खाद्यसंस्कृती बदलते. म्हणूनच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती विविधांगी आहे. बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी खाद्यसंस्कृती आहे. त्याचा आस्वाद घेण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईकरांना मिळत आहे. मुंबई फूड फेस्टमध्ये खवय्यांची एकूणच चंगळ आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच ‘वेध’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदाही दणक्यात कला महोत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवार, 12 जानेवारीपर्यंत महोत्सवाला भेट देता येईल.

कला महोत्सवाअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा भवन येथे मुंबई फूड फेस्टिव्हल सुरू आहे. धोंडस-शिरवाळे, कोंबडी वडे असा स्वाद, खान्देशची स्वादिष्ट पुरणपोळी, खिचा पापड, सावजी मटण, विविध प्रकारच्या बिर्याणी, व्हेज-नॉनव्हेज डिशेस, चटकदार भेळ, चाट कॉर्नर, सोबत ठंडा कुल आईस्क्रीम याशिवाय घरगुती पदार्थांचा आस्वाद घेताना रसिक दिसत आहे.

वनिता समाज येथे सुरू असलेले ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतीय नौदल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान सांगणारे हे प्रदर्शन आहे. त्यामुळे अवघा शिवकाळ उभा करण्यात आला आहे.

रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आणि संगीताच्या तालावर थिरकायला लावणाऱया मनोरंजनात्मक कार्यक्रमाची पर्वणी रसिकांना मिळत आहे. याअंतर्गत ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम शुक्रवारी सादर झाला.

कला महोत्सवाला विद्यार्थी, लहानथोरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण सेल्फी पॉइंटचा आनंद घेताना दिसत आहेत. लाईव्ह पेंटिंग प्रात्यक्षिक पाहताना दिसत आहेत.