उत्सव कलेचा… मुंबईकरांच्या मनातला! छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल 11 जानेवारीपासून

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार होणारा समस्त कलाप्रेमी मुंबईकरांना भुरळ घालणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’ 11 ते 14 जानेवारी या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे होणार आहे. कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा यांची महापर्वणी असलेला हा महोत्सव यंदाही कलाप्रेमींना आकर्षित करणार आहे.

‘वेध’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपन्न होणाऱया ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’चे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदाचे खास आकर्षण म्हणजे माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मृतिस्थळाच्या मागील जागेत ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे देशाच्या इतिहासात ‘महाराष्ट्रातील निष्ठावंत मराठय़ांचे योगदान’ सांगणारे प्रदर्शन पाहता येईल.

‘निर्मिती’ आणि लोकल बंधनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजकांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. पालक आणि चिमुकल्यांसाठी ‘किड्स कार्निव्हल’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. वनिता समाज हॉल येथे कलात्मक वस्तूंचे स्टॉल, लहानग्यांसाठी कला शिबीर यासोबत सेल्फी पॉइंट्स, आर्ट इन्स्टोलेशनने हा परिसर गजबजणार आहे. मुंबईकरांनी या महोत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक आणि शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे यांनी केले आहे.

पालिका क्रीडा भवन येथे ‘मुंबई फूड फेस्ट’च्या निमित्ताने अस्सल खाद्य महोत्सवाची मेजवानी, सृजनशील कलाकृती, आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धा, दादूस आला रे, कोकण कलेक्टिव्ह बँड, थ्री मॉन्क्स बँड’ ची संध्या कलारसिकांचा आनंद द्विगुणित करणार आहे.

‘पार्कातील कट्टा’ रंगणार

‘पार्कातील कट्टा’ म्हणजेच शिवाजी पार्क रियूनियनच्या निमित्ताने अनेक मित्र समूह शिवाजी पार्क कट्टय़ावर गप्पागोष्टी करण्यास एकत्रित येतील. दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘उभ्या उभ्या’ हा स्टॅण्डअप कॉमेडी शो हास्य रसिकांसाठी मेजवानी देणारा ठरेल. संगीतकार संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ ही कवितांची मैफल 12 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता रंगणार आहे. तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्ताने व्हॉलीबॉलप्रेमी आपली खेळाची रग भागविण्यासाठी सज्ज असतील. कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी www.csmpartfestival.com या संकेतस्थळाला भेट द्या.