लाईव्ह पोर्ट्रेट पेंटिंग, अवघ्या काही मिनिटांत कागदावर उतरणारे स्केच, मातीच्या गोळय़ाला आकार देणारे हात, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, हस्तकौशल्याचा आविष्कार…. छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल सामर्थ्य दर्शवणारे ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन आणि त्यातून उभा राहिलेला शिवकाळ… कला, संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा अपूर्व संगम दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरात दिसून येतोय. दरवर्षी मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा छत्रपती शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलला आजपासून दणक्यात सुरुवात झाली.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच ‘वेध’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. मुंबईकरांच्या मनातला कला उत्सव अशी याची ओळख बनली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी आज आर्ट फेस्टिव्हलला भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल 9 ते 12 जानेवारीदरम्यान पार पडत आहे. यानिमित्त कलाप्रेमींना विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे.
- कला महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन. या प्रदर्शनात शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती, सागरी किल्ल्यांची छायाचित्रे, मराठय़ांचा समुद्री लढायांचा इतिहास, शिवकालीन तलवारी, अली आदिलशाहाचे लारी नावाचे अत्यंत दुर्मिळ नाणे ठेवण्यात आले आहे.
- आर्ट फेस्टिव्हलमध्ये चित्रकलेची आवड असणाऱया रसिकांना चांगलीच पर्वणी आहे. अवघ्या काही मिनिटांत चित्र काढण्याचे प्रात्यक्षिक पाहावयास मिळत आहे. मातीच्या गोळ्याला आकार द्यायची संधीही मिळत आहे.
- महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन आणि त्याचा आस्वाद घेणारे खवय्या आणि सोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमाची पर्वणी आहेच.