शिवनेरीवरील महोत्सवाच्या निधीत पाच कोटींची कपात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महायुतीचे बेगडी प्रेम उघड

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी आणि जुन्नरमध्ये दरवषीं आयोजित केल्या जाणाऱ्या ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ निधीमध्ये महायुती सरकारने पाच कोटी रुपयांची कपात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन विधानसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच शिवजयंतीला शिवरायांबद्दल असलेले आपले बेगडी प्रेम उघड केले आहे. हा निधी महाबळेश्वर महोत्सवाकडे वळवला आहे.

गतवर्षी शिवजयंती उत्सवासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने 9 कोटी रुपये खर्च केला होता. यंदा तो चार कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. मिंधे गटाचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी हा ‘प्रताप’ केला आहे. विशेष म्हणजे निधी कपात करण्यात आलेल्या यंदाच्या शिवजयंती महोत्सवाच्या उद्घाटनासाठी येत्या 17 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुन्नरमध्ये येत आहेत.

पुणे जिल्ह्यातील महोत्सव आणि कामांसाठी निधी। मिळवण्याबाबत नेहमी अलर्ट असलेले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील शिवजयंतीच्या निधी कपातीवर गप्प आहेत. याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही महायुतीच्या आमदाराने याबद्दल आवाज उठवलेला नाही.

गेले वर्ष हे निवडणूक वर्ष असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले. त्यावर एकूण नऊ कोटी रुपये खर्च झाले. यंदादेखील याच दर्जाचे कार्यक्रम महोत्सवामध्ये नियोजित होते; परंतु शासनाने शिवनेरी शिवजयंती महोत्सवाच्या निधीत थेट 60 टक्के कपात केली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित अनेक कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. विशेष म्हणजे तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दरवर्षी शासनाच्या वतीने पाच दिवस शिवजयंती महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली होती. यंदा मात्र महोत्सव तीन दिवसांचा होणार आहे.

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत होते. महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील खाद्यसंस्कृती पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी खास बचतगट बाजार भरविण्यात येत होता. शिवकालीन खेडे तयार करण्यात आले होते. यंदा महोत्सवासाठी केवळ 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. परिणामी यातील अनेक कार्यक्रमांना कात्री लावावी लागली.

महाबळेश्वर महोत्सवासाठी निधी पळवला

शिवनेरीवरील महोत्सवाला देण्यात येणाऱ्या नऊ कोटी रुपयांच्या निधीमध्ये पाच कोटी रुपयांची कपात केली आहे. कपात केलेला हा निधी महाबळेश्वर महोत्सवाकडे पळविण्यात आल्याची चर्चा आहे. महाबळेश्वर महोत्सवाला दरवर्षी तब्बल 14 कोटींचा निधी देण्यात येतो. यंदा तो 21 कोटी रुपये करण्यात आला आहे.

शिवजयंती महोत्सवात दोन दिवसांची कपात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय व पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाच दिवसांचा शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा यात दोन दिवसांची कपात करण्यात आली असून, तो तीन दिवसांचा केला आहे. 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे.