
>> इसहाक बिराजदार
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी रयतेची जात अथवा धर्म कधी पाहिला नाही. आपल्या रयतेचा सांभाळ त्यांनी पोटच्या मुलासारखा केला. त्यांचा सर्व जीवनव्यवहार समताधिष्ठत न्यायतत्त्वावर उभा होता. महाराजांचे प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होते. म्हणूनच रयतेला हे स्वराज्य आपले वाटायचे. छत्रपती शिवरायांचे चरित्र दुहीची व द्वेषाची प्रेरणा देत नाही, तर उदार, उदात्त आणि व्यापक मानसिकतेची प्रेरणा देते.
‘राज्ये कोसळतील, साम्राज्ये विखुरतील, राजघराणी नामशेष होतील, पण राजा शिवछत्रपतींसारख्या नायकांची चैतन्यदायी स्मृती आलम मानवजातीसाठी इतिहासाचा चिरंतन ठेवा असेल’ असे गौरवपूर्ण उद्गार थोर इतिहास संशोधक यदुनाथ सरकार यांनी आपल्या ‘हाऊस ऑफ शिवाजी’ या ग्रंथात उद्धृत करून संत तुकारामांची अभंगवाणी सार्थ ठरवली आहे, जसे –
शिव तुझे नाम ठेवितो पवित्र।
छत्रपतीसूत्र विश्वाचे की।।
शिवछत्रपती स्वयंप्रज्ञ होते. आंतरिक ऊर्जा आणि ऊर्मी हेच त्यांचे प्रेरणास्रोत होते याची वस्तुनिष्ठ साक्ष उपरोक्त विधान देते. कवी परमानंदाने ‘शिवभारतात’ त्यांना ‘सनय’ ही उपाधी बहाल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात धार्मिक संघर्षाला वाव नाही. त्यांनी जाती-धर्माचे राजकारण केले नाही. धर्म आणि राजकारण अशी गल्लत केली नाही. राजकारणात धर्ममार्तंडांची लुडबुड सहन केली नाही. धर्ममार्तंडांनी कितीही भीती घातली तरी त्याला भीक न घालता सागरी किल्ले बांधले, आरमार उभारले.
शिवाजी महाराज धार्मिक होते, पण त्यांची धर्मभावना अंध नव्हती. त्यांची धर्मभावना डोळस व मर्मग्राही होती. ती कर्मकांडात रुतली नव्हती. त्यांच्या धर्मभावनेला वेदांताच्या विचारांची चंदेरी किनार लाभली होती.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचें।।
या संत तुकारामांच्या अमर वाणीचे छत्रपती शिवराय हे कृतिशील रूप होते. त्यांनी भेदाभेद भ्रम अमंगळ मानला. शिवाजी महाराजांनी दलितांना आपलेपणाने जवळ केले. इतकेच नव्हे तर मंदिरात प्रवेश मिळवून दिला. अनेक दलितांना किल्लेदार नेमले. बहिर्जी नाईक या मातंग समाजाच्या माणसाला हेरखात्याचा प्रमुख नेमले. अठरापगड जातीधर्माच्या तरुणांना मावळा संबोधून जिवाचे मैत्र बनवले आणि बलाढ्य मोगलांच्या छाताडावर पाय रोवून स्वराज्याचे तोरण बांधले.
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी रयतेची जात अथवा धर्म कधी पाहिला नाही. आपल्या रयतेचा सांभाळ त्यांनी पोटच्या मुलासारखा केला. त्यांचा सर्व जीवनव्यवहार समताधिष्ठत न्याय तत्त्वावर उभा होता. ‘हिस्टरी ऑफ मराठाज्’ या ग्रंथात ग्रँट डफ म्हणतो, शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला होता की, रयत, स्त्रिया आणि गाई यांना तोशिस होता कामा नये. स्त्रियांविषयी त्यांचा दृष्टिकोन अतिशय संवेदनशील होता. त्यांना ते देवघरातील देवता मानत. स्त्रियांची अवहेलना, विटंबना त्यांना मुळीच मान्य नव्हती. आजच्या बोलभांड राजकारण्यांनी यापासून बोध घ्यावा.
शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांविषयी कणव आणि शेतीविषयी आस्था होती. वतनदार शेतकऱयांना कसे ओरबाडत, लुबाडीत याचं मर्मभेदी वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी ‘शिवछत्रपतींचे चरित्र’ (सभासद बखर) या ग्रंथात केले आहे. महाराजांनी त्यांची वतनदारी संपवून टाकली. त्यांचे वसुलीचे व न्यायदानाचे अधिकार काढून घेतले. महाराजांचे प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होते. म्हणूनच रयतेला हे स्वराज्य आपले वाटायचे.
काही लोकांकडून शिवाजी महाराजांना मुस्लिमविरोधी ठरविण्याची अहमहमिका चालू असते. महाराजांच्या उदात्त आणि उत्तुंग चरित्राचा अभ्यास केल्यानंतर मात्र वेगळेच आढळते. महाराजांचा संघर्ष मुस्लिम राज्यकर्त्यांशी अवश्य होता, पण मुस्लिम धर्माशी नव्हता. त्यांचा संघर्ष पूर्णतया राजकीय होता. शिवछत्रपतींचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी मुसलमानांनीही आपले प्राण खर्ची घातले आहेत, रक्त सांडले आहे. सिद्दी हिलाल हा महाराजांचा निष्ठावान सरदार होता. घोडखिंडीत त्याने महाराजांसाठी आपल्या दोन मुलांसह रक्त सांडले आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराजांचा पहिला सरनौबत (सरसेनापती) नूरखान बेग होता असा उल्लेख ‘मराठय़ांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी केला आहे. शिवकालीन भारतात अत्याधुनिक शस्त्र्ाs म्हणजे तोफखाना. त्याचा प्रमुख होता इब्राहिम खान. महाराजांनी दौलतखान यास आरमारी प्रमुख पदावर नेमले होते. परराष्ट्र व्यवहार काझी हैदर याच्याकडे होते. तो खासगी पत्रव्यवहारही बघायचा. महाराजांच्या अंगरक्षकांपैकी एक सिद्दी इब्राहिम हा होता. सेवेकरी मदारी मेहतर हा त्यांचा चाकर होता. राघो बल्लाळ अत्रे यांच्या नेतृत्वाखालील 700 पठाणांची तुकडी महाराजांसाठी जीव ओवाळून टाकायला तयार होती.
2 नोव्हेंबर 1669 च्या पत्रात रघुनाथ पंडितरावांनी शिवछत्रपतींची आज्ञा उल्लेखलेली आहे. ‘श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा. यात कोणी बखेडा करू नये असे फर्माविले आहे.’ महाराज धर्माच्या बाबतीत आग्रही नव्हते. आपल्या प्रजेला समसमान मानणारे प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांची धर्मप्रेरणा ‘आत्मवत सर्वभूतेषु’ अशी होती. छत्रपती शिवरायांचे चरित्र दुहीची व द्वेषाची प्रेरणा देत नाही, तर उदार, उदात्त आणि व्यापक मानसिकतेची प्रेरणा देते. मोगलांच्या दरबारात दैनंदिन लेखक होते. खाफी खान हा त्यांच्यापैकी एक. तो हिंदूद्वेष्टा होता. मात्र छत्रपती शिवरायांच्या समन्वयशील, सहिष्णू आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाने भारावून तो लिहितो की, ‘शिवछत्रपतींसारखा चारित्र्यसंपन्न राजा या जगात दुसरा होणे शक्य नाही.’