सातासमुद्रापार शिवजयंती सोहळा साजरा होणार, किल्ले प्रतापगडावरून जपानला शिवज्योत रवाना

यंदा जपानमध्ये शिवजयंतीची भव्य तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी भारत कल्चरल सोसायटी, जपानने ही अनोखी संकल्पना साकारली आहे. किल्ले प्रतापगडावर विधिवत पूजन केलेली शिवज्योत यंदा थेट जपानच्या भूमीत पोहोचणार आहे. तब्बल सत्तर वर्षांनंतर प्रथमच जपानमध्ये शिवजयंती साजरी होत आहे. शिवजयंती उत्सवात भव्य पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक, लेझीम, ढोल-ताशा, फेट्यांचा थाट, तसेच शिवचरित्रावर आधारित भव्य महानाट्य सादर करण्यात येणार आहे.

प्रतापगडावरून जपानला जाणारी शिवज्योत ही ऐतिहासिक ठरणार आहे. महाराष्ट्रात जशी शिवजयंती गडांवरून मशालीच्या प्रकाशात साजरी केली जाते, तीच परंपरा पाळत भारत कल्चरल सोसायटी जपानने प्रतापगडावर विधिवत पूजा करून ही मशाल जपानला नेण्याचे नियोजन केले आहे. याकरता संस्थेचे कार्यकर्ते अनिकेत पाटील यांच्या सोबत बळवंत पाटील, महेश मोरे आणि स्थानिक सदस्यांनी प्रतापगडला भेट दिली. यावेळी क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा गिरगाव, कोल्हापूरचे वस्ताद प्रमोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन
मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले.

जपानमधील या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाला हिंदुस्थानचे जपानमधील राजदूत सिबी जॉर्ज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर टोकियोमधील स्थानिक महापौर, जपानमधील विविध भारतीय व जपानी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित राहणार आहे. दरम्यान, सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी मेहनत व तितक्याच स्थानिक कलाकारांच्या योगदानातून ‘शिवचरित्र’ महानाट्याच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम आणि इतिहास साकारला जाणार आहे. त्यामुळे या वर्षीचा शिवजयंती महोत्सव अधिक भव्य आणि भव्यदिव्य होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी पराक्रमाचा उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जपानमधील हा शिवजयंती सोहळा प्रेरणादायक ठरेल. भारत कल्चरल सोसायटी, जपान ही जपानमधील एक सेवाभावी संस्था असून, ती विविध उपक्रमांद्वारे भारतीय आणि जपानी संस्कृतींमध्ये सेतू बांधण्याचे काम करते.