राज्यभरात शिवजयंती जल्लोषात साजरी; नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती आज मुंबईसह राज्यभरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर विशेष कार्यक्रमांसह आकर्षक सजावट करण्यात आली हेती. मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सीएसएमटी मुख्यालय, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.

नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहर व जिह्यात बुधवारी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी भव्य देखावे, पोवाडय़ांचे सादरीकरण, भगवे झेंडे यांनी परिसर भगवामय झाला होता. दुपारी शहरासह उपनगरांमध्ये ढोलताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या. यात हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला. विविध चित्ररथ आकर्षणाचे केंद्र ठरले. मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळ व नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोकण रेल्वे रेल कामगार सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर तसेच वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन फायनान्स डायरेक्टर राजेश भडंग, डायरेक्टर वर्क्स आर. के. हेगडे, ओबीसी युनियन नेते रामनाथ पाटील, रेल कामगार सेना संयुक्त सरचिटणीस नरेश बुरघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम माँसाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल, नेरुळ तसेच तेरणा डेंटल कॉलेज नेरुळ आणि साईदृष्टी आय हॉस्पिटल, सानपाडा यांच्या सहकार्याने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण रेल्वे रेल कामगार सेना सरचिटणीस राजू सुरती, मिनाज झारी, समी दादरकर, नागराज देवाडिगा, जयसिंह देशमुख, श्रीकांत म्हात्रे, केतन खेडेकर, परशुराम शिंदे, संदीप मोरे आणि सहकारी यांनी मेहनत घेतली.

सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार पाळणा सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सोलापूर शहरातील शिवाजी चौकात मध्यरात्रीच्या सुमाराला अभूतपूर्व शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अश्वारूढ पुतळय़ाच्या चबुतऱयावर शिवरायांचा पाळणा विविध फुलांनी सजवण्यात आला होता. मध्यरात्री 12 वाजता बाल शिवबांचा जन्म झाला आणि जिजाऊंच्या वेशभूषेतील महिलांनी पाळणा हलवला. प्रचंड आतषबाजी आणि शोभेच्या दारूकामाने शिवाजी महाराजांच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुमारे 21 हजारांहून महिलांनी पाळणागीत सादर केले. या मंगलमय आणि उत्साही वातावरणात शिवबांचा जन्मसोहळा शाही थाटात संपन्न झाला.

सीएसएमटीच्या हेरिटेज वास्तूत घुमला शिवरायांचा जयघोष

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी झाली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी शिवरायांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, जो न्याय, नैतिकता व सहिष्णुतेवर आधारित होता. ते खरोखरच दयाळू, उदार आणि धर्मनिरपेक्ष राजे होते. या हेरिटेज टर्मिनसचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ करणे ही लोकांच्या सुरक्षेसाठी, प्रगतशील राज्याच्या उभारणीसाठी शिवरायांच्या अथक वचनबद्धतेला अभिवादन आहे, असे मीना म्हणाले. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. पोवाडय़ांमधून महाराजांच्या शौर्य आणि न्यायप्रियतेचे वर्णन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दादरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त भूषण गगराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

दादरमधील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळाच्या वतीने बुधवारी मोठय़ा उत्साहाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले शिवनेरी गडावर उत्सव समितीच्या कार्यकत्यानी शिवाईदेवीला अभिषेक करून आणलेली शिवज्योत 21 मावळय़ांसह फुलबाजारात आणण्यात आली होती. महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास प्रकाशित नमन नटवरानिर्मित सांस्कृतिक व लोकपरंपरा रंगसोहळा हा बहुगुणी संतोष परब निर्मित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना उपसचिव प्रवीण महाले, माजी नगरसेविका प्रीती पाटणकर, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, सचिन पडवळ, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखाप्रमुख प्रवीण नरे, दिनेश बोभाटे, महिला संघटक रिमा पारकर, माधुरी काळभोर, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष अमित बाणखिळे, मंडळाचे उपाध्यक्ष अविराज पवार, सचिव अजय कोसाळे, खजिनदार मच्छिंद्र शेलार, कार्याध्यक्ष प्रकाश बुचके, संचालक अण्णा मांजर्डेकर, चंद्रकांत हुलावळे, प्रवीण पुंडे, गणेश शेरकर, अजय खाडे, बापूसो लोळे तसेच असंख्य व्यापारी उपस्थित होते.