
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या प्रांगणात शिवजयंतीचा सोहळा थाटामाटात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि प्रेरणेची उजळणी करणारा हा सोहळा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला. हा सोहळा केवळ भव्यच नव्हे तर शिस्तबद्ध आणि नेटकाही होता अशा शब्दांत उपस्थितांनी आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले तसेच अशा कार्यक्रमांनी शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमाला पंपनीचे D-CP&P कमांडर वासुदेव पुराणिक, डायरेक्टर फायनान्स रुचिर अगरवाल आणि डायरेक्टर सबमरीन व हेवी इंजिनीअरिंग कमोडोर शैलेश जामगावकर यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी आपल्या मार्गदर्शनाने सर्वांना भारावून टाकले. शिल्पा परब यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषणातून शिव प्रबोधनाचा एक नवा आयाम उलगडला. कार्यक्रमाची सुरुवात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस किरण शिंदे यांनी आपल्या खुमासदार शैलीतील प्रास्ताविकाने केली, तर सूत्रसंचालनाची धुरा भारतीय कामगार सेनेचे युनिट कार्याध्यक्ष सचिन राऊळ यांनी सांभाळली. युनिट अध्यक्ष सुनील दळवी यांनी आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.