
शिवनेरी स्मारक समिती, पुणे व शिवजयंती उत्सव समिती, जुन्नर यांच्या वतीने किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवव्याख्याते विद्यावाचस्पती नंदकिशोर एकबोटे यांच्या हस्ते शिवाई मातेस सकाळी अभिषेक करण्यात आला. शिवाई मंदिर ते शिवपुंज शिवरायांची छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी शिवजन्मस्थानी पारंपरिक पद्धतीने पाळणा गायला. शिवपुंज स्मारकासमोर ध्वजारोहण झाल्यानंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहू संस्थानच्या वतीने संत तुकाराम महाराजांचे महावस्त्र अर्पण करण्यात आले. शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार डॉ. रश्मी घोलप, ह.भ.प. सुरेखा शिंदे, पाडळी कबाडवाडीच्या सरपंच स्वाती कबाडी, गोद्रेचे सरपंच अनिता रेंगडे, राणी बोऱहाडे यांना प्रदान करण्यात आला.
सलग दुसऱ्या दिवशी आग्यामोहोळाचा हल्ला
कडेलोट परिसरात आज सलग दुसऱया दिवशी पर्यटक तसेच शिवभक्तांवर आग्यामोहोळाच्या मधमाशांनी हल्ला केला. यामुळे गडावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनादेखील माशा चावल्या. 20 ते 25 शिवभक्तांना माशा चावल्या.