छत्रपती आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही! मनोज जरांगे यांचा मिंध्यांना इशारा

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मिंधे सरकारला दिला. सिंधुदुर्ग राजकोटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही वेदनादायक घटना आहे. पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषींना कायमचे जेलात पाठवा, अशी मागणीही त्यांनी केली.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मालवण पुतळा प्रकरणात मिंधे सरकारला खडे बोल सुनावले. या प्रकरणात दोषी असणारांना कायमचे जेलात पाठवा. कायद्याची जरब एवढी बसली पाहिजे की कुठल्याही महापुरुषाचा अपमान करण्यापूर्वी त्याने दहा वेळा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. 1 सप्टेंबर रोजी आपण सिंधुदुर्ग राजकोटावर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भाजपचे सरकार जात असल्याचे संकेत
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचाही मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. केसरकर अतिशय चाणाक्ष आहेत. त्यांच्या बोलण्यातील शुभसंकेताचा अर्थ भाजपचे सरकार जात आहे असा असावा, असा शालजोडीतला जरांगे यांनी हाणला.

वर्षपूर्तीनिमित्त आंतरवाली सराटीत बैठक
आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला 29 ऑगस्ट रोजी वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने गोदापट्ट्यातील 123 गावांतील मराठा समाजाची बैठक आंतरवालीत होणार असून त्यात या लढ्याची समीक्षा करण्यात येणार असल्याची माहितीही मनोज जरांगे यांनी दिली.