महाराष्ट्रातील जिल्हा संघांना आपली ताकद दाखवण्याची संधी देणाऱया 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आवाज बुधवारपासून बारामतीत घुमणार आहे. तो आवाज 19 जानेवारीपर्यंत असेल. या स्पर्धेत पुरुष व महिला असे एकूण 32 संघ आपल्या चढाई-पकडींचे कौशल्य दाखवतील
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन व राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यत आले आहे. स्पर्धेसाठी अत्याधुनिक मॅटची मैदाने तयार करण्यात आलेली असून प्रेक्षकांकरिता भव्य बैठक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. ही स्पर्धा साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार आहे. छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समितीमार्फत रोख पारितोषिक रकमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून या वेळी खेळाडूंना 44 लाख 60 हजार रूपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. पुरस्कारांची रक्कम वाढल्यामुळे सर्वच संघांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 12 संघ व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 4 असे 16 महिला व 16 पुरुष असे एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. पुणे जिह्यातून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा असे एकूण पुणे जिह्याचे तीन संघ सहभागी होणार आहेत.
प्रो कबड्डी स्टार खेळाडू मुख्य आकर्षण
या स्पर्धेत प्रो कबड्डीतील स्टार खेळाडू हे मुख्य आकर्षण असतील. अजित चौहान, शिवम पठारे, प्रणय राणे, आकाश शिंदे, संकेत सावंत, विशाल ताठे, शंकर गदई, सुनील दुबिले, जयेश महाजन, श्रेयस उबरदंड, आम्रपाली गलांडे, सलोनी गजमल, रेखा सावंत, हरजीत संधू, सोनाली शिंगटे, दिव्या गोगावले, समरीन बुरोंडकर, मंदिरा कोमकर, यशिका पुजारी, कोमल देवकर या पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपूर्ण खेळ पाहण्याची सुवर्णसंधी कबड्डी रसिकांना मिळणार आहे.