छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी – पुणे शहर, पालघरच्या दोन्ही संघांची आगेकूच

पुणे शहर व पालघरच्या संघांनी 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही विभागांत आगेकूच केली. याचबरोबर पुरुष विभागात कोल्हापूर, अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड, मुंबई उपनगर व महिला विभागात ठाणे शहर, सांगली, आपापल्या गटात विजय मिळविले.

बारामती येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या ‘अ’ गटात  पालघर संघाने अमरावती संघावर 53-32 असा विजय मिळविला. मध्यंतराला पालघर संघाकडे 27-14 अशी आघाडी होती. पालघरच्या प्रतीक जाधवने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अमरावतीच्या अभिषेक पवारने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत एकाकी लढत दिली. ‘ड’ गटात पुणे शहर संघाने सांगली संघावर 35-27 असा विजय मिळविला. मध्यंतराला पुणे शहर 13-14 असा पिछाडीवर होता, मात्र पुणे शहर संघाच्या भाऊसाहेब गोरणे याने चौफेर आक्रमण करीत आपली पिछाडी भरून काढली. याचबरोबर कर्णधार सुनील दुबिले याने चांगल्या पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांगलीच्या जीवन प्रकाशने उत्कृष्ट चढाया केल्या, तर कर्णधार अभिषेक गर्ग याने पकडी घेत सामन्यात रंगत आणली.

‘ब’ गटात कोल्हापूर संघाने विदर्भातील तगडय़ा समजल्या जाणाऱया वाशीम संघाला 42-23 असे पराभूत केले. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे 19-15 अशी आघाडी होती. कोल्हापूरच्या ओमकार पाटील व साहिल पाटील यांना जोरदार चढाया करीत वाशिम संघाला सावरण्यास संधीच दिली नाही, तर आदित्य पोवार व दादासाहेब पुजारी यांनी सुरेख पकडी केल्या. वाशीमच्या गजानन कुर्हे व आकाश चव्हाण यांनी चांगला खेळ केला. ‘ब’ गटात अहिल्यानगर संघाने मुंबई शहर पश्चिम संघावर 47-24 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला अहिल्यानगर संघाकडे 25-11 अशी आघाडी होती. अहिल्यानगरच्या आदित्य शिंदे याने चौफेर आक्रमण करीत संघाला विजय मिळवून दिला, तर सौरभ राऊत याने चांगल्या पकडी केल्या. मुंबई शहर पश्चिम संघाच्या जयेश यादव याने काहीसा प्रतिकार केला.