वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नावाजलेल्या एका बड्या उद्योजकाचे अपहरण करण्याचा कट शिजत असल्याची माहिती उद्योजकाने लेखी स्वरूपात तक्रार पोलिसांना केली होती. या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले यातील संशयित दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योजकांवर गावगुंडांकडून हल्ले सुरू असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्योग क्षेत्रात नावाजलेलं नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बड्या उद्योजकाचे अपहरण करून दाबून ठेवण्याचा कट शिजला होता. याबाबतची माहिती उद्योजकाला एका व्यक्तीने दिली होती. माहिती मिळताच उद्योजकाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी एनसी दाखल केली होती.
एनसी दाखल झाल्यानंतर कुठलीही कारवाई न करता पोलिसांनी आरोपींना वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे आपल्या जीविताला धोका होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन उद्योजकाने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र हे प्रकरण यापूर्वी जवाहर नगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याने त्यांनी हात वर केले होते.
उद्योजकाच्या तक्रारीची होणारी हेळसांड लक्षात घेऊन सर्व उद्योजकांचे शिष्टमंडळ मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोलचे. उद्योजकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गटात सहभागी असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस, उद्योजकांनी पाळली गुप्तता
उद्योजकाच्या अपहरणाचा कट शहरात शिजत असल्याची माहिती प्रसार माध्यमाला समजली तर मोठी खळबळ उडू शकते. त्यामुळे पोलीस प्रशासन व उद्योजक संघटनेने याबद्दलची माहिती कुठेच लिक होऊ नये याची खबरदारी घेतली होती. मात्र दोन आरोपी अटक केल्याने ही बाब उजेडात आली आहे.