जुन्या भांडणाच्या कारणावरून 7 ते 8 जणांच्या टोळक्याने युवकावर धारदार शस्त्राने वार करीत निघृण हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री बारा वाजता विद्यापीठ गेटसमोरील जयसिंगपुरा भागातील आम्रपालीनगरात घडली. सुमीत काशिनाथ जावळे (17) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, या हत्येप्रकरणी महिलेसह पाच आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मनपात सफाई कामगार म्हणून काम करणारे काशिनाथ सुदाम जावळे (45, रा. आम्रपालीनगर) हे पत्नी आणि दोन मुलांसह आम्रपालीनगर भागात भाड्याच्या घरात राहतात. मोठ्या मुलाचे नाव सुमीत तर छोट्या मुलाचे नाव रितेश आहे. सुमीत सोमवारी रात्री अकरा वाजता खामनदीच्या काठावर मोबाईल पाहत होता. यावेळी ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण (रा. साई मंदिरच्या पाठीमागे, पहाडसिंगपुरा), जयवीर टाक, जिता टाक (दोघे रा. सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा), ऋषी चव्हाण, जानू चव्हाण, पूनम विजय चव्हाण (तिघे रा. साई मंदिराच्या पाठीमागे, पहाडसिंगपुरा) यांच्यासह इतर साथीदार आले. त्यांनी सुमीतला गराडा घालून घरापासून काही अंतरावर असलेल्या गल्लीत ब्लूमिंग बर्ड्स स्कूलसमोर बळजबरीने घेऊन गेले.
‘आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करतो का?’ असे म्हणत मारहाण सुरू केली. त्यातील ऋतिक आणि जयवीर टाक यांनी सुमीतवर चाकूने वार केले. चाकूचे हे वार सुमीतच्या गळ्यावर आणि पाठीवर केल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी जीव वाचविण्यासाठी सुमीत व त्याचे वडील आरडाओरड करत होते. हा प्रकार पाहून नागरिक बाहेर येताच हल्लेखोर तेथून पळून गेले. हल्लेखोर पळून जाताच त्याच्या कुटुंबीयांनी सुमीतला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज जगताप आणि रात्रीला गस्तीवर असणारे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आज मंगळवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. या प्रकरणी काशिनाथ जावळे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खटाणे हे करीत आहेत.
बहिणीला पळवून नेणाऱ्याला केली होती मदत
काही महिन्यांपूर्वी टोळक्यातील आरोपींच्या बहिणीला सुमीतच्या मित्रांनी पळवून नेऊन लग्न केले आहे. त्यासाठी मयत सुमीत याने मदत केल्याचा संशय होता. या संशयातून या टोळक्यातील तरुणांचा सुमीतवर राग होता. त्यानंतर काही दिवसापूर्वी सुमीतच्या मित्राची दुचाकी फोडल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सुमीतला मिळणार होती मनपात नोकरी
काशिनाथ सुदाम जावळे हे मागील वीस वर्षांपासून महापालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला आहेत. वडील थकल्यामुळे वडिलांच्या जागी सुमीतला महापालिकेत लावण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र सुमीतचे वय एक वर्ष कमी असल्याने तो 18 वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहत होता. सुमीत हा दहावी नापास होता. त्यामुळे वडिलांच्या जागेवर मनपात नोकरी लागण्याची वाट पाहत होता.
मुख्य आरोपी अटकेत
घटना घडल्यानंतर सर्वच आरोपी पसार झाले. टोळक्यातील मुख्य आरोपी ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी नाशिक येथून अटक केली. इतर आरोपी फरार झाले असून, बेगमपुरा पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळावर रक्ताचा सडा
आरोपींनी सुमीतला घरापासून ओढत जवळपास 300 मीटरपर्यंत आणले होते. झेरॉक्स सेंटरच्या बाजूच्या गल्लीत त्याच्यावर वार केले. जीवाच्या आकांताने तो ओरडत होता. टोळक्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याची झटापट सुरू होती. तो गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकीवरही कोसळला. त्यानंतर तेथून 200 फूट अंतरावर ब्लूमिंग बर्ड्स स्कूलसमोरील रस्त्यावर कोसळला. मात्र, टोळके त्याला दगडाने मारहाण करीतच होते. सुमीतच्या रक्ताचा सर्वत्र सडा पडल्याचे दिसून आले.