छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे. शिर्डीला साई बाबांचे दर्शन घ्यायला निघालेल्या भाविकांच्या गाडीचा गंगापूर येथे अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला. या चौघांचे मृतदेह रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले जात असताना चालकाने मृतांच्या अंगावरील दागिने चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला अटक केली आहे.
हैदराबाद येथील 14 भाविकांनी छत्रपती संभाजीनगर येथील वेरुळ लेण्या पाहिल्या व घृणेश्वराचे दर्शन घेऊन ते गंगापूर मार्गे शिर्डीला जात होते. त्याचवेळी बुधवारी रात्री तांबूळ गोटा येथे त्यांच्या जीपचा अपघात झाला. या अपघातात वैद्विक श्यामशेट्टी, अक्षिता गडकुनुरी, प्रेमलत्ता श्यामशेट्टी व प्रसन्ना लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांचे नातेवाईक गंगापूर येथे आले असता त्यांना मृतदेहाचे दागिने सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी तक्रार केली असता रुग्णावाहिका चालकाने मृतदेहांवरील दागिने चोरल्याचे समोर आले. तसेच मृतांच्या पाकिटातील पैसेही त्याने चोरले होते.