छत्रपती संभाजीनगर: मॉलमध्ये बिबट्याची ‘विंडो शॉपिंग’; वनविभागाचे जवान शोधून शोधून हैराण

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिबट्यानं चांगलाचा धुमाकूळ घातला आहे. गेल्या 72 तासांपासून बिबट्याच्या वाटेकडे खडा पहारा देणारा वन विभाग मात्र त्याला शोधून हैराण झाला आहे. आता हा बिबट्या शहरातल्या आलिशान मॉलमध्ये शिरल्याचे वनविभागाला कळाले आहे. तसे cctv फुटेज देखील मिळाले आहे. मात्र तरी देखील बिबट्या अजून हाती लागलेला नाही. हा बिबट्या विंडो शॉपिंग करायला तर मॉलमध्ये गेला नव्हता ना, अशी हलकीफुलकी चर्चा शहरात रंगली आहे.

शहरातील प्रसिद्ध मॉल मध्ये काल रात्रीच्या सुमारास बिबट्या शिरताना CCTV मध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाचे पथक तिथे दाखल झालं. त्यांनी मॉल तात्काळ रिकामा केला आणि शोध सुरू केला. मात्र शोध शोध शोधूनही बिबट्या सापडत नसल्यानं त्यांची दमछाक झाली आहे.

या बिबट्याच्या शोधात मीडियाही चक्रावून गेला आहे. रविवारच्या रात्री अचानक बिबट्या उल्कानगरीत अवतरला. मध्यरात्री फ्युज बसवण्यासाठी आलेल्या दोन लाईनमनना तो दिसला. या लाईनमननी माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांना ही बातमी कळवली. भरवस्तीत बिबट्या स्वैर संचार करत असल्याचे कळाल्यावर वन विभागही आला. सोमवारी दिवसभर उल्कानगरीत बिबट्यापुराण चालू होते. अखेर सोमवारी रात्री खिंवसरा पार्कच्या मागे असलेल्या दाट झुडपांमध्ये पिंजरे लावण्यात आले. बिबट्याला आमिष दाखवण्यासाठी या पिंजऱ्यांमध्ये बकऱ्या ठेवण्यात आल्या. वन विभागाचे कर्मचारी लाठ्याकाठ्या घेऊन उभे राहिले. खास जुन्नर, नाशिक येथून आलेले नेमबाज आपल्या ‘शॉट’ रोखून सज्ज होते. परंतु बिबट्या वन विभागाच्या आमिषाला बधला नाही.

बिबट्याची प्रचंड दहशत

बिबट्याच्या दहशतीमुळे उल्कानगरीतील बालवाड्या, शाळा, ट्युशन, क्लासेस तीन दिवसांपासून बंद आहेत. रात्री या भागात अघोषित संचारबंदीच आहे.

फटाके फोडले, बँड वाजवला

बिबट्याच्या मुक्त संचारामुळे घाबरलेल्या उल्कानगरीतील नागरिकांनी फटाके वाजवून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी तर बँड वाजवण्यात आला. परंतु सीसीटीव्हीत दिसणारा बिबट्या प्रत्यक्ष काही अवतरला नाही. शेवटी बुधवारी वन विभागाने पिंजऱ्यातील बकऱ्या बाहेर काढल्या. शहरात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे बिबट्याच्या पाऊलखुणाही कुठे आढळल्या नाहीत.