ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांचे निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी कथाकार, कादंबरीकार आणि ग्रामीण साहित्यात विपुल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बोराडे यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बोराडे यांची ‘पाचोळा’कार म्हणून साहित्यिक वर्तुळात ओळख होती.

लातूर जिल्ह्यातील काटगाव या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात 25 डिसेंबर 1940 रोजी रावसाहेब बोराडे यांचा जन्म झाला. काटगावमध्ये आपले चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर माढा, बार्शी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथून बोराडे यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.

बोराडे यांची 1957 साली आपली कथा प्रसिद्ध झाली आणि त्याचा लेखक म्हणून प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी ‘पेरणी’ ते ‘ताळमेळ’, ‘मळणी’, ‘वाळवण’, ‘राखण’, ‘गोंधळ’, ‘माळरान’, ‘वरात’, ‘फजितवाडा’, ‘खोळंबा’, ‘बुरुज’, ‘नातीगोती’, ‘हेलकावे’, ‘कणसं’, ‘कडबा’ आदि कथासंग्रह लिहित मराठवाड्यातील कष्टकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली.

साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल बोराडे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. येत्या 27 तारखेला या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. मात्र तत्पूर्वीच बोराडे यांचे निधन झाले.