लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या नावाखाली 9 जणांनी वारंवार कॉल करून तब्बल 1 कोटी 18 लाख 51 हजार 360 रुपयांची एका निवृत्त जवानाची फसवणूक केली. याप्रकरणी निवृत्त जवानाने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले अरुण रामराव सानप (46, रा. के.टी. हाईट्स, जुना भावसिंगपुरा) हे सध्या एन्ड्युरन्स कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांनी 2019 मध्ये भारती अक्सा लाईफ इन्शुरन्स या कंपनीची पॉलिसी चालू केली होती. या कंपनीकडून वारंवार कॉल करून बोनस डिक्लेअर पॉलिसी खरेदी करण्यासाठी सांगत होते. त्यामुळे 17 जानेवारी 2020 रोजी मेहरा नावाच्या भामट्याचा कॉल आला. त्याने पॉलिसीसंदर्भात त्याचा सहकारी रणजित सिंग बोलणार असल्याचे सांगितले. त्याने दिलेली माहिती सानप यांना समजल्यानंतर त्यांना 15 हजार 337 रुपये भरल्यानंतर 1 लाख 3 हजार रुपये जुन्या भारती अक्सा लाईफ पॉलिसीचे मिळतील, असे आमिष दाखविले होते. त्यामुळे सानप यांनी पैसे भरले.
मात्र, यापैकी 60 टक्के रक्कम ही एजंट व 40 टक्के रक्कम तुम्हाला मिळणार असल्याचे सानप यांना सांगितले. मात्र, त्यासाठी सेल्फ कोड म्हणून आणखी एक पॉलिसी घ्यावी लागेल, असे रणजित सिंह यांनी सांगितले. त्यावरून सानप यांनी पत्नी मंगल सानप यांच्या नावे 20 हजार रुपयांची एक पॉलिसी खरेदी केली.
पॉलिसीची रक्कम परत मिळाली नाही म्हणून सानप यांनी रणजित सिंह यांना कॉल केले. मात्र त्यासाठी तुम्हाला आयटीआर रक्कम म्हणून 1 लाख रुपये भरावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे 20 जुलै 2020 मध्ये 1 लाख रुपये भरले. त्यानंतर 6 जानेवारी 2021 मध्ये एका मोबाईल नंबरवरून गायत्री नावाच्या महिलेचा कॉल सानप यांना आला. तुमची फाईलची तपासणी केली असून, पीएफटी बँक अकाउंटसाठी 1 लाख रुपयांची पॉलिसी घ्यावी लागले. त्यासाठी 1 लाख रुपये फोन पे करा, असे सांगितले. त्यावरून श्रीराम लाईफचे ऑनलाईन अकाउंटवर पाठविले. त्यानंतर आपली फाईल ट्रान्सफर होईल, असे सांगितले.
त्यानंतर अभिषेक मेहता, मल्होत्रा, चटवाणी, चतुर्वेदी, राजपूत, राधेश्याम शर्मा, जोशी, सुनीता चौधरी आदींनी वेळोवेळी कॉल करून पॉलिसी खरेदीच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 18 लाख 51 हजार 360 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अरुण सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.