Crime news – अंत्यविधीसाठी जाणे महागात पडले, चोरट्यांनी केले घर साफ!

सलामपुरेनगरात चोरट्यांनी अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरावर डल्ला मारून तब्बल 61 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सलामपुरेनगरात राहणारे जनार्धन लक्ष्मण मोरे (वय – 64) यांच्या निपाणी नामगाव ता. नेवासा येथील नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यामुळे ते 8 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता कुटुंबासह गेले होते. तेथून 11 मार्च रोजी सकाळी 5 वाजता शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना फोनवरून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची पाहणी केली असता त्यात तीन तोळे सोन्याचे गंठण, चांदीचे दोन छोटे ग्लास, चांदीचा देवीचा शिक्का, चांदीचे एक फुलपात्र असा एकूण 61 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.

गटातटामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने अनेकजणांनी ठाण्यात पुन्हा आपले पाय रोवले आहेत. त्यातच आपलाही एक हस्तक ठाण्याचा असावा त्यासाठी काहींची खास बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्यात गट-तट झाल्याची चर्चा आहे. परिणामी त्याचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होत आहे. ठाण्यात अधिकारी वाढले तशा घटनाही वाढत असल्याने पोलिसांचा वचक कायम ठेवण्याची गरज असल्याची चर्चा आहे.