
दारू पिऊन येऊन सतत त्रास देणाऱ्या पोटच्या मुलास रागाच्या भरात मारहाण करताना पित्याचा टोला मुलाच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रांजणगाव शेणपुंजी येथील श्रीरामनगरात उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
श्रीरामनगरात राहणारे विनायक तुपे यांचा मुलगा नारायण तुपे (वय – 32) हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दहा वाजता दारू पिऊन आला होता. त्यामुळे वडील विनायक तुपे (वय – 52) यांच्याशी वाद झाला. तसेच नारायण हा 32 वर्षाचा असून देखील त्याचा विवाह होत नव्हता. त्यामुळे तो नेहमी दारु पिऊन आई-वडिलांशी भांडण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारणावरून दोघांमध्ये जोराचे भांडण झाले.
नारायण हा मद्यप्राशन करून घरी आला. त्यामुळे चिडलेल्या पित्याने लोखंडी मुसळी त्याच्या डोक्यात घातली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह रात्रभर तसाच घरात पडून ठेवला होता.
सकाळी नारायणचा अपघात झाल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव वडील विनायक तुपे यांनी केला. त्यामुळे सकाळी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालातून त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तात्काळ वडील विनायक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.